नामदेव मोरे
नवी मुंबई : भारतीय आंब्याला जगभरातून पसंती वाढू लागली आहे. या वर्षीही मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. आखाती देशांबरोबर अमेरिका, यूकेसह अनेक प्रमुख देशांमध्ये हापूसची निर्यात सुरू झाली आहे. पणन मंडळाच्या नवी मुंबईमधील विकिरण सुविधा केंद्रातून आतापर्यंत ६०२ टन आंब्याची निर्यात झाली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी ८० हजार ते १ लाख पेट्यांची रोज आवक होत आहे. कोकण व दक्षिणेकडील राज्यांमधून येणारा आंबा मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील स्थानिक मार्केटबरोबर विदेशातही पाठविला जात आहे. आखाती देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होत असली तरी आता युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडातील अनेक देशांमधूनही मागणी वाढत आहे. या देशांमध्ये आंबा पाठविताना निर्जंतुकीकरणाचे निकष काटेकोरपणे पाळावे लागतात. हॉट वॉटर ट्रीटमेंट व रेडिएशन करून आंबा निर्यात करावा लागतो. यासाठी पणन मंडळाने बाजार समितीजवळ विशेष विकिरण सुविधा केंद्र उभारले आहे. या ठिकाणी आंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये पाठविणाऱ्या आंब्याचा दर्जा तपासण्यासाठी त्यांचा निरीक्षक याठिकाणी आला आहे. त्यांच्याकडून तपासणी झाल्यानंतरच आंबा निर्यात केला जातो.दररोज १० टन आंबा परदेशातयंदा पणनच्या केंद्रातून रोज दहा टन आंबा निर्यात होत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया व यूएसएला १९० टन, यूकेला ४००, जपानला २, न्यूझीलंडला १० टन आंबा निर्यात झाला आहे. याव्यतिरिक्त बाजार समितीमधील १५ निर्यातदारांच्या माध्यमातून आखाती व इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे.
यूएस, यूकेसह अनेक देशांमध्ये निर्यात होत आहे. निर्यातीचे निकष पाळून आंब्याची निर्यात केली जात असून, विकिरण प्रक्रियेसाठी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध करून दिली आहे. - मोहन डोंगरे, निर्यातदार
बाजार समितीने प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. निर्यातीत अडथळा येऊ नये यासाठी २४ तास बाजारपेठ खुली आहे. - संगीता अढांगळे, उपसचिव