नवी मुंबई : दुर्धर आजारावर मात करीत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९0 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या वाशी येथील अमेय सुनील सावंत या विद्यार्थ्याचे माजी खासदार संजीव नाईक यांनी त्याच्या घरी जाऊन अभिनंदन केले. याप्रसंगी इयत्ता दहावीत प्रावीण्य मिळविलेल्या इतर विद्यार्थ्यांचेही नाईक यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.वाशी सेक्टर १0 मधील जेएन-२ टाईपमधील महालक्ष्मी सोसायटीत राहणारा अमेय हा वाशीतील सेंट मेरीज मल्टीपरपज शाळेचा विद्यार्थी आहे. इयत्ता पाचवीपर्यंत तो इतर नॉर्मल मुलांप्रमाणे खेळायचा, बागडायचा; परंतु अचानक त्याला मस्क्युलर डिस्ट्रोफी या स्नायूच्या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यामुळे त्याचे बागडणे थांबले. त्याला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला.तळपायापासून कमरेपर्यंतच्या भागाची त्याची हालचाल बंद झाली. हाताची हालचाल करणे अशक्य झाले. अशा परिस्थिती केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर व्हीलचेअरवरून दहावीची परीक्षा देऊन त्याने ९0 टक्के गुण मिळविले आहेत.विशेष म्हणजे त्याने कोणतीही खासगी शिकवणी लावली नव्हती. वर्गातील कनक देवकर, यश शिंदे व आश्लेषा घाडगे यांच्या मदतीने त्याने आपला अभ्यास पूर्ण करून हे यश संपादित केले. रविवारी त्याच्या घरी जाऊन संजीव नाईक यांनी त्याच्या या प्रेरणादायी यशाचे कौतुक केले. अमेयला सी.ए. व्हायचे आहे. त्यामुळे त्याच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही नाईक यांनी अमेयच्या पालकांना दिली. या वेळी माजी नगरसेवक राजू शिंदे, सेंट मेरी स्कूलचे शिक्षक दुर्गाप्रसाद देवकर, ओएनजीसी कामगार संघटनेचे सेक्रेटरी सुरेश ननावरे, अजित कांडर, महादेव डुंबरे, वैभव कदम, तुकाराम वाघमारे, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
दुर्धर आजारावर मात करत दहावीत ९0 टक्के मिळवणाऱ्या अमेय सावंतवर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 2:12 AM