नवी मुंबई- मनसेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानाला सध्या जिल्ह्यात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मनसेच्या शाखांमध्ये जाऊन पक्षाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न अमित ठाकरे करत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा आणि पुनर्बांधणी करण्यासाठी आले असून, त्यांचे आज वाशी टोलनाक्यावर स्वागत करण्यात आले.
अमित ठाकरेंचे कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जोरदार स्वागत केले. महा जनसंपर्क अभियानांतर्गत आज नवी मुंबईत आले असून, ते आज विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले आहे.
दरम्यान, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिथं शिवसेना नेमकी कुणाची? यावरुन लढाई सुरू आहे. तर भाजपाला पुन्हा सत्तेत आल्यानं स्फुरण चढलं आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहिली जात आहे. पण अमित ठाकरे मात्र राज्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर लोकांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र आहे.
मनसे राज्यातील सत्तासंघर्षापासून बरीच दूर आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे देखील शस्त्रक्रियेमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करत होते. तेही अजून फारसे काही बोलले नाहीत आणि सक्रिय देखील झालेले नाहीत. पण आपल्या पक्षाची बांधणी करण्याची धुरा अमित ठाकरेंनी घेतलेली दिसत आहे.