नवी मुंबई मनसेचे नेतृत्व अमित ठाकरेंकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 02:44 AM2019-11-26T02:44:58+5:302019-11-26T02:45:14+5:30
महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने नवी मुंबई मनसेची धुरा युवा नेते अमित ठाकरे यांनी हाती घेतली आहे.
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने नवी मुंबईमनसेची धुरा युवा नेते अमित ठाकरे यांनी हाती घेतली आहे. त्यानुसार प्रत्येकाच्या गाठीभेटीवर भर दिला जात असून पुढील काळात अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनेदेखील केली जाणार आहेत. अशातच मनसेला लागलेली गळती रोखण्याचे आव्हान शहर अध्यक्षांपुढे निर्माण झाले आहे.
राज्यातल्या राजकारणात उलथापालथ सुरू असतानाच नवी मुंबई मनसेतदेखील गळती सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मनसेचे संदीप गलुगडे, नितीन चव्हाण तसेच श्रीकांत माने यांनी मनसेची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ इतरही काही जण पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याचे समजते. मनसेच्या ध्येय व धोरणाविषयी नाराजी व्यक्त करीत दुसऱ्या पक्षाचा मार्ग निवडल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या ते संपर्कात होते.
मात्र मागील एक महिन्यापासून मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून त्यांची मनभरणी सुरू होती. यानंतरही त्यांनी पक्षांतराच्या निर्णयावर ठाम राहून नुकताच राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या गळतीमुळे गजानन काळे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत मनसे रिंगणात उतरणार असल्याचे नुकतेच मनसेच्या नेत्यांनी नेरुळमध्ये झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. त्यानुसार अमित ठाकरे यांच्याकडे नवी मुंबईची धुरा देण्यात आली असून, मागील काही दिवसांपासून ते सातत्याने नवी मुंबईत बैठका व सभा घेऊन पक्ष बळकटीचा प्रयत्न करत आहेत.
याशिवाय अमित ठाकरे यांच्या राजकीय आंदोलनांची सुरुवातदेखील नवी मुंबईतूनच केली जाणार आहे. याकरिता अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुढील काही दिवसांत वेगवेगळी आंदोलने केली जाणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत मनसेला लागलेली गळती रोखण्यासाठी अमित ठाकरे यांना आपले नेतृत्व कौशल्य पणाला लागणार आहे.