नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनातील फरकाची ९० कोटी रुपयांची थकबाकी सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी थकविल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मंगळवार, २१ जानेवारी रोजी बेलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. येत्या स्थायी समिती सभेत सदर प्रस्तावाला मंजुरी देऊन कामगारांना न्याय न दिल्यास २७ जानेवारीला कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.महापालिकेतील ६,५०० कंत्राटी कामगारांच्या १४ महिन्यांच्या किमान वेतनातील फरकाची उर्वरित रक्कम महापालिकेने द्यावी, यासाठी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेकडून मोर्चे काढण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासकीय बाबी पूर्ण केल्यानंतरही प्रस्ताव मंजूर केला जात नसल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. नागरिकांनी पालिकेच्या ईमेलवर जास्तीत जास्त मेल करून कंत्राटी कामगारांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केले. या वेळी कामगार सेनेचे शहराध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, मनसेचे उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे, प्रसाद घोरपडे, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव दिनेश पाटील, महिला सेनेच्या शहराध्यक्षा डॉ. आरती धुमाळ, अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन खानविलकर, सुरेश मढवी, योगेश शेटे आदी उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी थकवली कामगारांची रक्कम - संदीप देशपांडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 2:42 AM