ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या आफ्रिकनला अटक, साडेपाच लाखाचे मेफेड्रोन जप्त
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 10, 2023 05:20 PM2023-08-10T17:20:12+5:302023-08-10T17:20:54+5:30
अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये विदेशी नागरिकांचा देखील सहभाग पुन्हा एकदा दिसून येऊ लागला आहे.
नवी मुंबई : अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका आफ्रिकन व्यक्तीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. कोपरी येथे छापा लावून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५ लाख २० हजार रुपये किमतीचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांमध्ये विदेशी नागरिकांचा देखील सहभाग पुन्हा एकदा दिसून येऊ लागला आहे. त्यानुसार एक आफ्रिकन व्यक्ती कोपरी येथे अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांच्या पथकाने बुधवारी दुपारी कोपरी येथील रिक्षा थांब्यालगत सापळा रचला होता. त्याठिकाणी आलेल्या एका आफ्रिकन नागरिकाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५२ ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले.
बाजारभावानुसार त्याची किंमत ५ लाख २० हजार रुपये आहे. नेझेकॉसी ऑगस्टीन (३५) असे आफ्रिकन व्यक्तीचे नाव असून तो बोनकोडे येथील कुलसुम अपार्टमेंटमध्ये रहायला आहे. त्याच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यामध्ये इतर कोणाचा समावेश आहे का याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.