- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : राज्यभरातील पोलिसांच्या कामगिरीवरून जनतेला किती सुरक्षित वाटते याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी संस्थेमार्फत जनसामान्यांमधून काही प्रश्नावलीतून सुरक्षाधारणा निर्देशांक काढला जाणार आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबविला जाणार असून त्याची सुरुवात नवी मुंबई व सातारा येथून केली जाणार आहे.
सामाजिक स्वास्थ्यासाठी पोलिस आणि नागरिक यांच्यात सलोख्याचे संबंध आवश्यक आहेत. मात्र, अनेकदा काही कारणांनी समाजात पोलिसांची प्रतिमा मलिन होत असते. त्याचे पडसाद नागरिकांच्या रोषातून उमटत असतात. त्यामुळे आपली प्रतिमा स्वच्छ राखण्यासाठी पोलिसांकडूनदेखील विविध उपक्रम राबविले जातात. पोलिसांवर दैनंदिन कामकाजासह घडलेल्या गुन्ह्यांचा तपास, फरार गुन्हेगारांचा शोध, प्रतिबंधात्मक कारवाया, नियोजित बंदोबस्त, आंदोलने यांचीही जबाबदारी असते. त्या माध्यमातून पोलिसांचा नागरिकांसोबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध येत असतो.
यादरम्यान पोलिसांच्या कृती आणि वर्तनातून नागरिकांमध्ये चांगली किंवा वाईट प्रतिमा तयार होत असते. त्यावरून नागरिकांना किती सुरक्षित वाटते याचेही अनुमान बांधले जातात. याच्या तपासणीसाठी पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील पोलिस घटकांसाठी पथदर्शी स्वरूपात इंडेक्स ऑफ सेफ्टी परसेप्शन तयार करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात नवी मुंबई पोलिस आयुक्तालय व सातारा पोलिस अधीक्षक क्षेत्रातून केली जाणार आहे.
संस्थेमार्फत हे काम केले जाणार असून त्यासाठी प्रश्नावली तयार केली जाणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दलची काय भावना आहे हे तपासून त्यांना शहरात सुरक्षित वाटत आहे का हे तपासले जाणार आहे. त्यामुळे या चाचणीतून नागरिकांच्या भावनांचा उद्रेक समोर येण्याची शक्यता आहे.
प्रतिमा उजळविण्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न मागील काही महिन्यांपासून नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे हे कर्मचाऱ्यांकडून शिस्तीचे धडे गिरवून घेत आहेत. त्यातच नवी मुंबईत हा पथदर्शी उपक्रम राबविला जाणार असल्याने पोलिसांना त्यांची प्रतिमा उजळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.