एक न केलेला गुन्हा... अन् कुटुंबाचे जीवन गेले अंधारात, आठ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून निर्दोष सुटका
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 29, 2024 08:54 AM2024-07-29T08:54:52+5:302024-07-29T08:55:49+5:30
नेरूळमधील पॉक्सो प्रकरण
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पॉक्सोच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाचा डीएनए न जुळून आल्याने उच्च न्यायालयाने शिक्षकाची निर्दोष सुटका केली आहे. सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात शिक्षकाच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबाला स्वतःची ओळख लपवून जगावे लागत होते. तर, दोन्ही लहान मुलांना चार वर्षे शिक्षणापासूनही वंचित राहावे लागले. एका न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा या कुटुंबाला भोगावी लागली.
नेरुळ येथील खासगी शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी अटकेत असलेल्या हरिशंकर शुक्ला या शिक्षकाची उच्च न्यायालयाने अलीकडेच निर्दोष सुटका केली. शुक्ला यांच्यावर २०१६ मध्ये गुन्हा दाखल होताच त्यांच्या अटकेसाठी आंदोलने झाली. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याने तिच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, तिच्याच परिवारातील एका तरुणावर संशय असल्याने त्याचीही डीएनए चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी होत होती. शुक्ला यांना सत्र न्यायालयाने १० वर्षे कैद व दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात शुक्ला परिवाराच्या वतीने वकील सिद्द विद्या यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
अंतिम सुनावणीत न्यायाधीशांनी शुक्ला यांची निर्दोष सुटका केली. त्या मुलीच्या गर्भातील बाळाचा डीएनए व शुक्ला यांचा डीएनए जुळून न आल्याने हा निकाल देण्यात आला. या निर्णयाने शुक्ला यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असला तरी, न केलेल्या गुन्ह्याची आठ वर्षे भोगलेल्या शिक्षेने त्यांच्या पत्नी व दोन्ही मुलांचा अजूनही थरकाप उडत आहे.
मुलांची परवड
शुक्ला यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नीला दोन मुलांसह राहते घर सोडण्यास भाग पाडले गेले. फीसाठी पैसे नसल्याने दोन्ही मुलांना शाळा सोडावी लागली. वडिलांवरील गुन्ह्यांमुळे इतर शाळेतही प्रवेश मिळत नव्हता. अखेर गतवर्षी त्यांना एका शाळेत प्रवेश मिळाला. वडील निर्दोष सुटूनही आपली पुसलेली ओळख परत समोर यायला नको या भीतीने ते उघडपणे भावनाही व्यक्त करू शकत नाहीत.