वैभव गायकर
पनवेल : लहानपणापासून प्राण्यांसाठी काहीतरी करावे अशी भावना बाळगलेल्या अनामिका चौधरी या हजारो मोकाट पाळीव प्राण्यांचे पालन पोषण करून त्यांच्यावर उपचार करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यासाठी त्यांनी हँड दॅट हिल संस्था सुरू केली आहे. विशेष म्हणजे पाळीव प्राणी मोकाट कुत्र्यांबद्दल अनेकांच्या मनात भीती असते. मात्र, अनामिका याला अपवाद आहेत. त्या दररोज मोकाट कुत्र्यांवर उपचार करतात. पनवेलमधील कर्नाळा अभयारण्य परिसरात अनामिका यांचे ॲनिमल सेंटर कार्यरत आहे. याठिकाणी आजही ७०० पेक्षा जास्त रस्त्यावर पडलेले कुत्रे , मांजरी , गाढव आदींसह विविध प्राण्यांचे पालन पोषण केले जात आहे.
आवश्यकता भासल्यास त्यांच्यावर वैद्यकीय उपचार तसेच शस्त्रक्रिया देखील केली जाते. याकरिता काही सामाजिक क्षेत्रातील मंडळी मदतीसाठी येतात. मात्र चौधरी या यामध्ये मुख्य दुवा बनल्या आहेत. केवळ विकास, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष न देता मुक्या प्राण्यांच्या रक्षणाची जबाबदारी हे देखील आपले कर्तव्य समजून ते यशस्वीपणे पार पडणाऱ्या अशा महिलांमुळेच समाजाची जडणघडण योग्य दिशेने होत असते.
शेकडो प्राण्यांना जीवनदाननवी मुंबई विमानतळासाठी पनवेलमधील दहा गावे सिडकोने स्थलांतरित केली. ग्रामस्थांचे पुनर्वसन केले. मात्र, मोकाट कुत्रे , मांजरे , गुरे- ढोरे आदींसह पक्षी , प्राण्यांबाबत धोरण राबविले नाही. अनामिका यांनी स्वतः गावात फिरून शेकडो कुत्रे , मांजरी, गुरे यांना आपल्या सेंटरमध्ये निवारा उपलब्ध करून दिला.
माझ्या वडिलांना मी नेहमीच मुक्या प्राण्यांना मदतीचा हात देताना मी पाहत आले आहे. त्यांच्यापासून मी प्रेरणा घेऊन माझे कर्तव्य पार पाडत आहे. हे काम करताना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते. समाजातील काही मंडळी यामध्ये आडकाठी करण्याचे काम करत असतात. पण, मी माझे काम करत राहते -अनामिका चौधरी