नवी मुंबई : ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्यावर दुर्ग अभ्यासकांना नवीन भुयार (गुंफा) आढळून आली आहे. भुयार क्रमांक दोनच्या पुढे जवळपास ८० फुटांवर कातळामध्ये नवीन भुयार आढळले आहे. किल्ल्याचा पुरातन वारसा सांगणारी ही खूण आहे. दुर्ग अभ्यासकांनी गडघेऱ्याच्या परिसरातील पुरातन अवशेषांचा शोध व अभ्यास सुरू केला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा किल्ला व अभयारण्य हे राज्यातील पर्यावरणप्रेमी पर्यटक व अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठिकाण. या परिसरात जवळपास १५० प्रकारचे पक्षी आढळतात. कर्नाळा किल्ल्यालाही विशेष महत्त्व आहे. किल्ल्याचा अंगठ्याच्या आकाराचा सुळका महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांचेही लक्ष वेधून घेत असतो. किल्ल्यावर पाची टाकी, कोठारे, वाड्याची इमारत, घरांची जोती, चौकी, मेट, शरभ, शिल्प अशा वस्तूंचे अवशेष पाहावयास मिळतात. दुर्ग अभ्यासक गणेश रघुवीर व सह्याद्री प्रतिष्ठानचे पनवेलमधील सदस्य मयूर टकले यांनी नुकताच किल्ल्यावर अभ्यासदौरा केला होता.
किल्ल्यावर दोन भुयारे आहेत. यापैकी एक प्रवेशद्वारातून उजव्या बाजूला वळले की आढळते व दुसरे कर्णाई मंदिराजवळील चौथऱ्याजवळ आहे. दोन नंबरच्या भुयाराच्या पुढील कातळाची पाहणी करत असताना ८० फुटांवर तिसरे भुयार असल्याचे पाहणीमध्ये आढळून आले. कड्यावरून तेथील झाडीत उतरल्यानंतर ते निदर्शनास आले. कोरीव भुयार ८० टक्के मातीने बुजले आहे. समोर गवत व झुडपेही वाढली आहेत.
किल्ल्यावर आढळलेल्या तिसऱ्या भुयाराची छायाचित्रे, त्यांचे अक्षांश व रेखांश व जीपीएस लोकेशन नोंद केले आहे. याविषयी वनविभाग, पुरातत्त्व विभाग यांना कळविण्यात आले आहे. भुयारामधील माती काढल्यानंतर त्याचा पूर्ण आकार लक्षात येऊ शकेल. किल्ल्याच्या प्राचीन अस्तित्वाचीच ही खूण आहे. कर्नाळा किल्ल्याच्या घेऱ्यातील कल्ले, आपटे व इतर गावांच्या परिसरामध्येही अजून ऐतिहासिक अवशेष, वीरगळ आढळण्याची शक्यता आहे. इतिहास अभ्यासक त्यांचा शोध घेऊन त्यांची माहिती सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
कर्नाळावर अभ्यास मोहीम राबविली असताना किल्ल्यावर तिसरे भुयार आढळून आले आहे. पुरातन अस्तित्वाची ही खूण असून, परिसरातील इतर अवशेषांचीही माहिती घेतली जात आहे. पुरातत्त्व विभाग व वनविभागालाही याविषयी माहिती दिली आहे. -गणेश रघुवीर, दुर्ग अभ्यासक
संरक्षित कठड्याविषयी समाधानदुर्ग अभ्यासक गणेश रघुवीर यांनी २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वनविभागांतर्गत गडकिल्ले संवर्धन समितीमध्ये काम करत असताना कर्नाळा किल्ल्यावरील निसरड्या पायवाटांच्या दुरुस्तीसाठीच्या सूचना केल्या होत्या. वनविभागाने त्या ठिकाणी रेलिंग बसवून मार्ग सुरक्षित केला आहे. यामुळे दुर्ग अभ्यासकांनी समाधान व्यक्त केले आहे.