उरण : पीरवाडी दर्ग्यासमोरच्या बीचवरील समुद्रातील एका खडकावर अडकलेल्या नवी मुंबईच्या चार विद्यार्थ्यांची रविवारी सुखरूप सुटका करण्यात आली. बचावकार्यासाठी उरण पोलिसांसह सागरी सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. वेळीच मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचविण्यात यश आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऐरोली-नवी मुंबई येथील एका कॉलेजमधील चार मित्र फिरण्यासाठी पीरवाडी बीचवर गेले होते. सकाळी ८:३०च्या सुमारास शैलेश शिवाजी काळे (वय २२), सुमेध भंगूर मिश्रा (२४), सागर संजय गावणे (२४), सुमेध दीपक आबसदा (२२) हे पीरवाडी दर्ग्यासमोरील बीचवरील समुद्रातील खडकावर बसून उंच लाटांचा आनंद लुटत होते. मात्र, तासाभरातच चोहोबाजूंनी समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्याने खडक वेढला गेला.
जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा
लाटा, वेगाने वाहणाऱ्या प्रवाहामुळे चौघा मित्रांना खडकावरून हालचाल करणे कठीण झाले. जीव वाचविण्यासाठी त्यांनी आरडाओरडा करताच किनाऱ्यावरील नागरिकांचे त्यांच्याकडे लक्ष गेले.
किनाऱ्यावरील सागरी सुरक्षारक्षक स्वप्निल माळी याने मदतीसाठी सहकारी संतोष कडू, योगेश काठे, नवशाद कुरेशी, अकबर कुरेशी, योगेश म्हात्रे, अवधूत पाठारे यांना बोलावले.
उरण पोलिसांनाही कळविले. माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, सागरी सुरक्षा दलाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समन्वय साधून दोन बोटींतून त्या चौघांनाही समुद्राबाहेर काढले.