आंध्र ते नवी मुंबई :हस्तकला कारागिरांचा १,१०० कि.मी.चा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:57 AM2017-10-11T02:57:31+5:302017-10-11T03:03:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी वस्तूंचे उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले आहे. भारतातील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी देशात ही चळवळ उभी राहिली.
वैभव गायकर
पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी वस्तूंचे उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले आहे. भारतातील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी देशात ही चळवळ उभी राहिली. त्याच संकल्पनेचा एक भाग म्हणून दिवाळीसाठी थेट आंध्र प्रदेशातील नेलोर जिल्ह्यातून हस्तकलाकारांनी ११०० कि.मी.चा प्रवास करीत खारघर गाठले आहे.
वेतापासून बनवलेल्या शोभेच्या विविध वस्तू तयार करून विकण्याचे काम या ठिकाणी आलेले आठ जणांचे कुटुंब करीत आहे. दिवाळीत आकाश कंदिलांना मोठी मागणी असते. या कारागिरांनी हाताने तयार केलेले, तर काही वेताने विणलेले विविधरंगी कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत चायना मेड वस्तूंचे वर्चस्व आहे. मात्र, स्वदेशीच्या नाºयाला प्रतिसाद देत अनेकांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्यावर भर दिला आहे. शिवाय भारतीय हस्तकलाही चायना मेड वस्तूंच्या तोडीस तोड असल्याने खारघरमध्ये विक्रीस ठेवलेले शोभेच्या वस्तू सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. शहरातील उत्सव चौक ते टाटा रुग्णालय मार्गावर या वस्तू रस्त्याच्या एका बाजूला विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याकरिता थेट आंध्रप्रदेशातून ट्रक भरून वेताचे लाकूड आणण्यात आले असून दिवसभर विविध वस्तू विणण्याचे काम कारागिरांकडून सुरू असते.