प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 12:44 AM2020-02-02T00:44:51+5:302020-02-02T00:46:11+5:30
थकीत वेतन तत्काळ देण्याचे आश्वासन
नवी मुंबई : राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्याशिवाय वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम देण्यासही विलंब होत आहे. असे अनेक प्रश्न निकाली काढण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रायगड भवनवर मोर्चा काढला होता. या वेळी तीन महिन्यांचे थकीत वेतन तत्काळ देण्याचे आश्वासन बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ठाणे, रायगड व मुंबई अशा तीन जिल्ह्यांतील ८०० हून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी सीबीडी बेलापूर रेल्वेस्थानक येथून रायगड भवनपर्यंत टाळ वाजवत भजन करत आंदोलन केले. त्यास कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
मागील तीन महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामध्ये एक लाख सेविका तर एक लाख मदतनिसांचा समावेश आहे. हे सर्व जण मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यापैकी अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या वेतनावर होत आहे. अशातच त्यांचे वेतन रखडत असल्याने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे.
या वेळी शिष्टमंडळाने सेवा योजनेच्या आयुक्त इंदिरा मालो यांची भेट घेऊन कर्मचाºयांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. त्याची दखल घेत अल्प कालावधीतच कर्मचाºयांना थकीत वेतन देण्याचे आश्वासन आयुक्त मालो यांनी दिल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कमही लवकरात लवकर देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, राजेश सिंह, दिनकर म्हात्रे यांच्यासह प्रकल्पप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा योजना आयुक्तांच्या ठोस आश्वासनानंतर या मोर्चाची सांगता करण्यात आली.
वेळेवर वेतन देण्याची मागणी
अशाच प्रकारातून २०१७ मध्ये परभणी येथील अंगणवाडी सेविकेने आत्महत्याही केलेली असल्याचे संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कर्मचाºयांना वेळेवर वेतन मिळणे गरजेचे आहे. त्याची जाणीव बालविकास सेवा योजना विभागाला करून देण्याच्या उद्देशाने शनिवारी रायगड भवनवर मोर्चा काढण्यात आला.