राज्यातील अंगणवाडी कर्मचारी दोन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 01:09 AM2021-05-03T01:09:38+5:302021-05-03T01:09:55+5:30
मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मानधन वाढविण्याची मागणी
बोर्ली-मांडला: एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी महिला कर्मचारी काम करीत असून गेल्या दोन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असून तातडीने मानधन देण्यात यावे. याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी महिला कर्मचारी काम करीत आहेत. अंगणवाडीत काम करणाऱ्या या महिलांना ग्रामीण, आदिवासी विभागात व शहरी क्षेत्रातील गरीब कुटुंबापैकी आहेत. राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या मानधनाची रक्कम न दिल्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत असून त्यांना तातडीने मानधन देण्यात येऊन होणारी उपासमार थांबवावी, अशी मागणी करण्यात आली असून सदर निवेदनाच्या प्रती राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना माहिती व कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत.
राज्यातील सुमारे ५३३ प्रकल्पात २ लक्ष अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. ५३३ पैकी सुमारे ४२५ प्रकल्प हे ग्रामीण व आदिवासी विभागात कार्यरत आहेत. या प्रकल्पात गरीब, विधवा, परित्यक्ता अंगणवाडी महिला काम करत आहेत. मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन न मिळाल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जगणं मुश्कील झाले आहे.अशाही परिस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर घर चालवणं अवघड होत आहे.कुपोषण संपवणारी अंगणवाडी कर्मचारी आज मानधन न मिळाल्यामुळे कुपोषित झाले आहे. - जिविता पाटील, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी
कर्मचारी संघ ठाणे, अलिबाग रायगड प्रतिनिधी