‘बाराबंगला’त ‘एंजल्स पॅराडाइज’ थीम पार्क
By Admin | Published: November 18, 2016 02:56 AM2016-11-18T02:56:06+5:302016-11-18T02:56:06+5:30
दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या निसर्गरम्य अशा ठाणे पूर्वेतील बाराबंगला परिसरात लवकरच ‘एंजल्स पॅराडाइज’ थीम पार्क उभे राहणार आहे.
ठाणे : दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या निसर्गरम्य अशा ठाणे पूर्वेतील बाराबंगला परिसरात लवकरच ‘एंजल्स पॅराडाइज’ थीम पार्क उभे राहणार आहे.
ठाणे शहरात ठिकठिकाणी असलेल्या उद्यानांची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून बिकट आहे. त्यात मैदानेही नसल्याने लहानग्यांच्या खेळण्याची सवय कमी होत चालली आहे. परंतु, लहानग्यांबरोबर मोठ्यांचेही मनोरंजन व्हावे, यासाठी बाराबंगला येथे थीम पार्क ठाणे महापालिका उभारत आहे. निसर्गरम्य ठिकाण असलेल्या या परिसरात पूर्व आणि पश्चिमेतील नागरिकांची सकाळ संध्याकाळी वर्दळ असते. जॉगिंग, व्यायाम, गप्पाटप्पा करण्यासाठी, निवांत बसण्यासाठी किंवा अभ्यासासाठी विद्यार्थी या ठिकाणी येतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची करमणूक व्हावी, यादृष्टीने महापालिका सर्व सोयीसुविधायुक्त असे थीम पार्क सुमारे ४ कोटी रु पये खर्च करून उभारण्यात येत आहे. या थीम पार्कमध्ये २००० फूट लांबीचे सिंथेटिक ट्रॅक, जॉगर्स ट्रॅक, १५ ते २० फायबरच्या विविध प्रतिकृती, फायबर मेकचे १०० विद्युत दिवे, शोभिवंत्कारंजे व धबधबे, अस्तित्वातील भिंतीची दुरुस्ती करून त्यावर रंगचित्रे काढणे, पाथ वे, मुलांना अभ्यासासाठी व खेळण्यासाठी जागा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा, शोभिवंत झाडे, फुलझाडे, आसनव्यवस्था, अद्ययावत प्रवेशद्वार आदी विविध सुविधा असणार आहेत. टप्प्याटप्प्याने या पार्कचे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार, सिक्युरिटी केबिन कम बॅगेज काउंटर, कारंजे, काही ठिकाणी नवीन पाथ वे, जुन्या पाथ वेचे नूतनीकरण, कॉलोनेड वॉल, आउट डोअर फिटनेस साहित्य आदी कामे केली जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली. पुढील टप्प्यांत उर्वरित कामे पार पडणार आहेत. १० दिवसांत पहिल्या टप्प्यास सुरुवात होईल. (प्रतिनिधी)