नवी मुंबई : शासनाने इयत्ता दुसरीच्या गणित विषयामध्ये आकडे म्हणण्याची पद्धत बदलली आहे. इंग्रजीप्रमाणे आकड्यांचा उच्चार करण्यास सुचविले आहे. पूर्वीप्रमाणे बावीस न म्हणता वीस दोन असे बोलावे लागणार असून या पद्धतीने गणित शिकविणे अवघड होणार आहे. याशिवाय अशाप्रकारे आकड्यांचा उल्लेख करणे अव्यवहार्य ठरणार असल्यामुळे पालकांसह नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.शालेय अभ्यासक्रमात ठरावीक वर्षांनंतर बदल करणे आवश्यक असते; परंतु हे बदल सकारात्मक व व्यवहार्य असणे आवश्यक आहे. शासनाने इयत्ता दुसरीच्या गणितामध्ये बदल करताना हास्यास्पद सूचना केली आहे. मराठीमधील आकडे बोलण्याची वेगळी पद्धत आहे; परंतु जुन्या पद्धतीने आकडे बोलणे जोडाक्षरे कठीण असल्याचे सांगत यापुढे पंचावन्न असे न म्हणता पन्नास पाच असे बोलावे, छप्पन असे न बोलता पन्नास सहा असा उच्चार करावा असे सुचविले आहे. अभ्यासक्रमात दोन्ही पद्धती दिल्या आहेत. पण शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवावे अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे शिक्षकांचाही गोंधळ निर्माण होणार आहे. यासाठी अद्याप प्रशिक्षणही झालेले नाही. विद्यार्थी व पालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक एखाद्या विद्यार्थ्याला नवीन पद्धतीने शिकविले व त्याला दुकानामध्ये जाऊन बावन्न रुपयांच्या वस्तू घेऊन ये असे सांगितले व त्याने जाऊन पन्नास दोन रुपयांच्या वस्तू द्या असे बोलायचे का. अशाप्रकारे मुले बोलू लागल्यास समोरील व्यक्ती चेष्टा करण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.शासनाने आकडे बोलण्याची जुनी पद्धत सुरू ठेवावी अशी मागणी केली जात आहे. नवीन अव्यवहार्य व इंग्रजीचे अनुकरण करणारी पद्धत बंद करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही अनेकांनी दिला आहे.दुसरी इयत्तेचा अभ्यासक्र म बदलण्यात आला आहे. त्यात गणित विषय शिक्षकांनी शिकवणे व शिकवलेली गणित पद्धत मुलांना तसे समजण्यास खूप अडचणी येत आहेत. या विषयी शिक्षण विभागाकडून तशा प्रकारचे प्रशिक्षणही शिक्षकांना देण्यात आले नाही. मराठी भाषेत जोडाक्षरांना खूप महत्त्व आहे. त्यातील स्पष्ट उच्चारण त्याचबरोबर चढउतार याद्वारे मराठी भाषेत वापर केला जातो. जुनीच पद्धतीने शिकवणे योग्य वाटते. बालभारतीने सोपी पद्धत आहे म्हणून गणित विषयात बदल करण्यात आल्याने मुलांना आकलनात आणि घोकमपट्टी करण्यास अवघड होणार आहे.- प्रवीण शिलवंत, मुख्याध्यापकगुरु लिंगेश्वर प्राथमिक शाळा पनवेलदुसरीचा अभ्यासक्र म बालभारतीने बदलला खरा पण गणित विषयासंदर्भात सांगायचे झाले तर जुनी पद्धत आणि नवीन पद्धतीमुळे मुलांना गोंधळात टाकले आहे. पाढे पाठ करण्यात अडचण येणार आहे. जुनीच पद्धत योग्य होती. त्यामळे आकलन आणि पाढे पठण करण्यास सोईस्कर होते. या विषयी पुनर्विचार व्हावा असे वाटते.- बालाजी घुमे,शिक्षण तज्ज्ञ, पनवेलगणित या विषयात बालभारतीने जो बदल केला आहे तो योग्यच आहे. मराठी भाषेतील उच्चारामुळे मुलांना लक्षात ठेवणे तसेच पठण करण्यास अवघड जात होते. नवीन पद्धतीने मुलांना सहज शिकता व पाढे पाठ करण्यास सोईस्कर होईल. तशी शब्दरचनेत सोप्या पध्दतीने फोड करून दिली आहे. ती मुलांसाठी उपयुक्त ठरेल.- भास्कर भाले,पालक, नवीन पनवेलबालभारतीने बदल केलेल्या अभ्यासक्र माविषयी सांगायचे झाले तर मुलांना आपण शिकवले त्या पद्धतीने ती शकली जातात. पालकांचा मोठ्या प्रमाणात इंग्रजीकडे कल वाढला आहे. त्यामुळे त्यांना ही नवीन पद्धती सोपी वाटते आहे. पण मराठी भाषेचा इंग्रजी पद्धतीने अवलंबल्याने लहान मुलांच्या शिक्षणात मराठी भाषेची गळचेपी केल्याचे दिसून आले आहे. पुस्तकात दोन्ही पद्धती दिल्याने मुलांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. जुनी पद्धतच चांगलीच होती.- संजीव म्हेत्रे,जिल्हा परिषद शाळा आसुडगाव
दुसरीच्या गणित विषयातील बदलाविषयी नाराजी; पूर्वीचीच पद्धत ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:25 PM