नवी मुुंबई : मुंबईतील कचरा टाकण्यासाठी ऐरोलीजवळ ३२ एकर जागा डम्पिंग ग्राउंडसाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याच्या नावाखाली नवी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात टाकण्याचा डाव सुरू आहे. शहरवासीयांच्या हितासाठी हा डाव कधीच यशस्वी होऊ दिला जाणार नसून, प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडविषयी तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार यांनी दिला आहे. मुंबई महापालिकेच्या देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीनंतर मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील कचऱ्यासाठी पर्यायी डम्पिंग ग्राउंंड शोधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. राज्य शासनाने ऐरोलीजवळील ३२ एकर जमीन मुंबई महानगरपालिकेला डम्पिंग ग्राउंडसाठी देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. याचे तीव्र पडसाद नवी मुंबईमध्ये उमटत आहेत. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँगे्रसने डम्पिंग ग्राउंडला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन मुंबईतील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याच्या नावाखाली नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा डाव आखत आहे. ऐरोलीजवळ डम्पिंग ग्राउंड झाले तर या परिसरातील नागरिकांना तीव्र दुर्गंधीला सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय क्षय, दमा व इतर आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. नवी मुंबई राष्ट्रवादी काँगे्रसने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन शहराच्या वेशीवर डम्पिंग ग्राउंड होऊन देऊ नका, अशी विनंती केली आहे. याविषयी निवेदनही त्यांना दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याविषयी निवेदन दिले आहे. शहरवासीयांचा विरोध डावलून जर निर्णय घेतला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आमदार संदीप नाईक यांच्या जनसंवाद कार्यक्रमातही नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात निवेदन नाईक यांच्याकडे दिले.
प्रस्तावित डम्पिंगविरोधात नाराजी
By admin | Published: February 08, 2016 2:50 AM