नवी मुंबईत संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको, मतदारसंघ गेल्याने असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 02:46 AM2019-10-03T02:46:56+5:302019-10-03T02:47:20+5:30
युतीचे जागावाटप जाहीर झाल्यापासून नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
नवी मुंबई : युतीचे जागावाटप जाहीर झाल्यापासून नवी मुंबईमधीलशिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वाशी मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये शिवसेना उमेदवार निवडणूक लढेल, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून अर्धा तास रास्ता रोको केले.
नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. ३० सप्टेंबरला प्रमुख पदाधिकारी उमेदवारीचा आग्रह धरण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. या पदाधिकाºयांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघ भाजपला सोडण्यात येणार असल्याचे पक्षप्रमुखांनी सांगितल्यानंतर सर्व पदाधिकारी नाराज होऊन नवी मुंबईत परतले. रात्री वाशी मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये एकतरी मतदारसंघ शिवसेनेला मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली. अधिकृत उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. मंगळवारी पुन्हा शिवसेना शिष्टमंडळ मातोश्रीवर गेले; परंतु पक्षनेतृत्वाने नवी मुंबईमधील दोन्ही जागा भाजपला गेल्या आहेत. भाजपमधून बेलापूरमधून गणेश नाईक यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असे सांगून युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे सांगण्यात आल्याचे काही पदाधिकाºयांनी सांगितले. अखेरचा प्रयत्न म्हणून बुधवारी पुन्हा प्रमुख पदाधिकारी मातोश्रीवर गेले. नवी मुंबईमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी दिली जावी, अशी मागणी केली जाणार होती. याविषयी पक्षाने नक्की काय आश्वासन दिले याविषयी रात्री उशिरापर्यंत कोणीही काहीच भाष्य केले नाही.
नवी मुंबईमधील शिवसेना पदाधिकारी दिवसभर वाशी मध्यवर्ती कार्यालयात तळ ठोकून होते. शहरात पक्षाचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर विधानसभा निवडणूक लढलीच पाहिजे, अशी भूमिका मांडली. विधानसभा निवडणूक लढली नाही तर भविष्यात महापालिका निवडणुकीमध्येही पक्षाचे नुकसान होईल, अशी भूमिका मांडली. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून कोपरखैरणे ते वाशी रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास वाशीकडे जाणाºया मार्गिकेवरील वाहतूक अडवण्यात आली होती. यामुळे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. दिवसभर पदाधिकाºयांनी वाशी मध्यवर्ती कार्यालयाच्याबाहेरील रोडवर गर्दी केली होती. मध्यवर्ती कार्यालयामध्ये उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक संजू वाडे, रंगनाथ औटी, विशाल ससाणे, सोमनाथ वास्कर, महिला आघाडीच्या पदाधिकारीही उपस्थित होते.
बंडखोरीवरून शिवसेनेमध्ये दोन गट
ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये बंडखोरी करण्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शहरप्रमुख विजय माने, मिलिंद सूर्याराव यांच्यासह अनेक पदाधिकाºयांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. दोन्ही मतदारसंघात कोणत्याही स्थितीमध्ये बंडखोरी करून शिवसेनेचा उमेदवार उभा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दुस-या गटाने मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला आहे. यामुळे युतीच्या उमदेवाराचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाचा आदेश डावलून बंडखोरी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसेनेतील बंडखोरी टिकणार की नाही, याविषयीही उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेतेही संपर्कात
शिवसेनेला एकही मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली नाही, यामुळे ऐरोली व बेलापूरमधून उमदेवारीसाठी इच्छुक असणाºया काही पदाधिकाºयांशी राष्ट्रवादीने संपर्क साधल्याची चर्चा शिवसेना कार्यालयात सुरू होती.