उरण : उरण विधानसभा मतदारसंघात आमदार मनोहर भोईर यांच्या विरोधात नाराज शिवसैनिकांची संख्या वाढत आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतरही जिल्हाप्रमुखांनी नाराजी दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. सेनेच्या अशा नाराज पदाधिकाऱ्यांची संख्या दीडशे पार असून त्यांनी सेना उमेदवारांच्या विरोधात काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार मनोहर भोईर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
उरण मतदारसंघात मनोहर भोईर यांच्या विरोधात सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच प्रचंड नाराजी आहे. पाच वर्षांत भोईर यांच्या मनमानीमुळे पदाधिकारी सेनेच्या कार्यक्रमांकडेही फिरकेनासे झाले आहेत. उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदारांनी मर्जीतील निकटवर्तीयांना उमेदवारी दिली होती. भोईर यांच्या निर्णयाला विरोध करणाºया सेनेच्याच उमेदवारांनी विरोधकांच्या मदतीने त्यांना पराभूत करण्याचे काम केले होते.
सेनेची उनपमध्ये सेनेची सदस्य संख्या नऊपर्यंत होती. मात्र पाडापाडीच्या राजकारणात सेनेला फक्त पाचच नगरसेवक निवडून आणता आले. त्यामुळे सेनेला उनपच्या सत्तेपासून दूर राहावे. सेनेच्या अंतर्गत कलहामुळे नाराज झालेल्या दिडशेहुन अधिक शिवसैनिकांनी पाच वर्षांपासून पक्षाबरोबर असहकाराची भुमिका घेतली आहे. त्याचा फटका सेनेचे मनोहर भोईर यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवार मनोहर भोईर यांना नाराज शिवसैनिकांच्याबरोबरच प्रतिस्पर्धी शेकाप उमेदवार विवेक पाटील आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्याशीही सामना करावा लागत आहे.उनपमध्ये मागील निवडणुकीत सेना-भाजप यांनी परस्परांविरोधात निवडणूक लढविली होती आणि सेनेला पराभूत करून भाजपने उनपवर निर्विवाद सत्ता काबीज केली होती. दरम्यान, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही उरणमध्ये मनोहर भोईर आणि महेश बालदी एकमेकांविरोधात उभी ठाकले होते.