करंजा-रेवस रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 06:50 PM2023-10-06T18:50:28+5:302023-10-06T18:51:19+5:30
या रो-रो सेवेशी जोडणारा रस्ता करंजा येथील ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिर आणि जवळच असलेल्या शाळेजवळून जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी उत्खनन करावे लागणार आहे. रस्त्याशिवाय रो-रो सेवा खऱ्या अर्थाने कार्यान्वितच होऊच शकत नाही.
मधुकर ठाकूर -
उरण : करंजा ते रेवस या मार्गावरील रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम शाळा आणि ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. करंजा-रेवस सागरी मार्गावर लवकरच रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.
या रो-रो सेवेशी जोडणारा रस्ता करंजा येथील ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिर आणि जवळच असलेल्या शाळेजवळून जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी उत्खनन करावे लागणार आहे. रस्त्याशिवाय रो-रो सेवा खऱ्या अर्थाने कार्यान्वितच होऊच शकत नाही. कारण सद्यस्थीतीत असणारा करंजा जेट्टी ते उरण चारफाटा या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. याआधीच सुरू झालेल्या मच्छीमार बंदरामुळे या जुन्या रस्त्याने वाहनांची वर्दळ वाढली असल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच रो-रो प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर करंजा विभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.या परिसरात विनापरवाना केलेल्या अनधिकृत मातीच्या उत्खनाने जुन्या रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच अनधिकृतपणे होत असलेल्या उत्खननावर कारवाई करुन या पुढे उत्खननास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.त्यामुळे या प्रस्तावित रस्त्याला ग्रामस्थांनी याआधीच विरोध केला आहे.
या विरोधानंतरही ठेकेदारांनी करंजा ते रेवस या मार्गावरील रो-रो सेवेशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती.जेसीबी यंत्राच्या साहाय्याने रस्त्यासाठी उत्खनन करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.रस्त्याचे काम शाळा आणि ऐतिहासिक द्रोणगिरी देवीच्या मंदिराला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बंद पाडले. ग्रामस्थांनी या भागात उत्खनन करण्याच्या कामाला याआधीच विरोध दर्शवून हरकतीही नोंदविल्या असल्याची माहिती चाणजे तलाठी तेजस चोरगे यांनी दिली.