४ दिवसांपासून माडाच्या झाडावर अडकून पडलेल्या मांजराच्या पिल्लांला वाचवण्यासाठी प्राणीमित्रांची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 08:30 PM2022-09-20T20:30:09+5:302022-09-20T20:31:18+5:30
उरण शहरातील बोरी येथील एका भंगार मालकाच्या पाळलेल्या मांजरीच्या पिल्लाचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला.
उरण - पाठलाग करीत असलेल्या कुत्र्यापासून जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ५० फूट उंचीच्या माडावर मागील चार दिवसांपासून अडकून पडलेल्या सहा महिन्यांच्या मांजरांच्या पिल्लांची प्राणीमित्र राजेश नागवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सुखरूप सुटका केली.
उरण शहरातील बोरी येथील एका भंगार मालकाच्या पाळलेल्या मांजरीच्या पिल्लाचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. भक्ष्यासाठी कुत्र्यांनी जोरदार पाठलाग केला. मात्र जीव वाचवण्यासाठी मांजरीचे पिल्लू जीवाच्या आकांताने घराच्या शेजारीच असलेल्या एका ५० फूट उंचीच्या माडावर चढले. माडावर जीव वाचवण्यासाठी मागावर चढलेल्या मांजरीच्या पिल्लाला पावसामुळे निसरड्या झालेल्या माडाच्या झाडाच्या वाटेवरून उतरता येईना. त्यातच सतत कोसळणाऱ्या जोरदार मुसळधार पाऊसामुळे तीनचार दिवसांपासून मांजरीचे पिल्लू ५० फूट उंचीच्या माडावरच अडकून पडले होते.
जोरदार पावसामुळे काही काळ मालकानेही नाईलाजाने त्याकडे कानाडोळा केला. अडकून पडलेल्या मांजराच्या पिलाचे ओरडणे सातत्याने कानी पडत असल्याने अस्वस्थ झालेल्या मालकाने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले होते. माडापर्यत पोहचण्यासाठी मार्ग नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना माघारी परतावे लागले. त्यानंतर ही बाब प्राणीमित्र राजेश नागवेकर व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना समजल्यावर ते घटनास्थळी पोहोचले.
पावसाचा जोर कमी होताच प्राणीमित्रांनी
मांजरीच्या पिलाला वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. सलग तीन तास प्राणी मित्रांचे प्रयत्न सुरू होते. प्रयत्नांना यश मिळत नव्हते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी निसर्गच धावून आला. जोरदार आलेल्या वाऱ्यामुळे घाबरून बिथरलेल्या मांजरीच्या पिल्लाने ५० फूट उंचीच्या माडाच्या शेजारीच असलेल्या तितक्याच उंचीच्या असलेल्या सुरुच्या झाडाच्या फांदीवर जीवाच्या आकांताने उडी घेतली. स्वतछहून सुरुच्या झाडावरून खाली उतरूनजमीन गाठलेले पिल्लू थेट मालकाच्या हातात विसावल्याची माहिती प्राणीमित्र राजेश नागवेकर यांनी दिली.