अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य सत्संग; हजारो भाविक उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 02:11 AM2020-01-01T02:11:49+5:302020-01-01T02:11:51+5:30
नेरूळमध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम
नवी मुंबई : सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्यावर लिहिलेल्या भक्तीरचनांच्या सादरीकरणासाठी मंगळवारी नेरुळमधील डॉ.डी.वाय. पाटील स्टेडियमवर ‘अनिरुद्ध भक्तीभाव चैतन्य’ या सत्संगाचे आयोजन केले होते. नियोजनबध्द आखणी असलेल्या या कार्यक्रमाला देश विदेशातील हजारो भाविक उपस्थित होते.
पद्मश्री डी. वाय. पाटील आणि त्यांचा मुलगा विजय पाटील यांनी देखील या कार्यक्रमास भेट दिली होती.
अनिरुद्ध भक्तीभाव चैतन्य या सुमारे आठ तासांच्या कार्यक्रमात विविध अभंगांचे सादरीकरण करण्यात आले. बापूंच्या आगमनानंतर प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर बापूंनी भक्तांशी संवाद साधला. देशभरातील विविध उपासना केंद्र तसेच देश -विदेशातील ४० हजाराहून अधिक भक्त उपस्थित होते. कार्यक्रम परिसरात पार्किंग, वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी पोलीस बंदोबस्तासह अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे (एएडीएम) स्वयंसेवकांना तैनात करण्यात आले होते. स्टेडियम परिसरात बेकायदेशीरपणे उभी वाहने हटवून पोलिसांनी रस्ता वाहतुकीसाठी रिकामा केला होता. या भक्तिभावाने पूर्ण अशा सत्संगाची सांगता रात्री १० वाजताच्या सुमारास झाली.