नवी मुंबई : समाजात प्रत्येकाला निर्भयपणे वावरता यावे, तसेच एक सुदृढ समाज तयार करण्याच्या हेतूने रविवारी बेलापूर परिसरात निर्भय वॉकचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसतर्फे बेलापूर परिसरात सकाळी ७ वाजता ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करण्यात आला.महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत. ‘आम्ही तुमच्या गोळीला घाबरत नाही, विवेकाचा आवाज बुलंद करत राहू’ असा संदेश देत हा वॉक करण्यात आला. डॉ. दाभोळकर व पानसरे हे मॉर्निंग वॉकला गेले असता, माथेफिरूंनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. दाभोळकर यांच्या हत्येला ५३ महिने उलटून गेले तरी आरोपी मोकाटच आहेत. त्यांच्या खुनानंतरच्या प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर वाढत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शाखा स्थापन होत असून, शिबिरे, आंदोलने, मोहिमा, संघर्ष, उपक्र मांतून या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. कर्नाटकातील विचारवंत प्रा. एम. एन. कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. या सर्वांचे मारेकरी व सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. याचा निषेध नोंदवत डॉ. दाभोळकर, पानसरे व प्रा. कलबुर्गी यांचे चित्र असलेले अॅप्रॉन घालून फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर या घोषणा देत, मॉर्निंग वॉक करण्यात आले. या निर्भय वॉकच्या माध्यमातून पोलीस प्रशासन, शासनाचा निषेध करण्यात आला.
बेलापूरमध्ये अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन, दाभोळकरांच्या हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:53 AM