नवी मुंबई - अन्नपूर्णा सामाजिक संस्थेच्यावतीने वाशीमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. संस्थेच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून व्यवसाय उभारणीसाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.वाशीमधील सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यास ८ हजारपेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. अन्नपूर्णा परिवारच्या अध्यक्षा डॉ. मेधा पुरव यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. झोपडपट्टीमधील महिलांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देणे. आरोग्य विमा व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. देशात सर्वत्र कॅशलेस व्यवहारावर भर दिला जात आहे. यामुळे वर्षभरामध्ये संस्थेनेही महिलांना कॅशलेस सेवा पुरविल्या आहेत. त्यासाठी महिलांचे बँकेत खाते उघडून देण्यात आले आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात आला आहे. नोटाबंदीमुळे संस्थेचे जे सभासद अडचणीत आले त्यांनाही सहकार्य करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनीही आदिवासींसह महिलांच्या प्रश्नांविषयी माहिती दिली. देशातील प्रश्नांवर संंघटित होवून लढा देण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.महिला, कामगार यांना चांगले दिवस आले आहेत का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी उद्योग क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या महिलांचा गौरवही करण्यात आला. यावेळी अनिल कुमार, सुरेश धोपेश्वरकर, अंजली पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. \
अन्नपूर्णा सामाजिक संस्थेचा झोपडपट्टीमधील महिलांना आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 4:26 AM