अण्णासाहेब पाटील महामंडळाने घडविले एक लाख उद्योजक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 08:48 AM2024-07-31T08:48:35+5:302024-07-31T08:49:06+5:30

आतापर्यंत विविध बँकांच्या माध्यमातून ८३२० कोटी रुपयांची कर्जे वितरीत केली असून ८३२ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. 

annasaheb patil corporation created one lakh entrepreneurs | अण्णासाहेब पाटील महामंडळाने घडविले एक लाख उद्योजक

अण्णासाहेब पाटील महामंडळाने घडविले एक लाख उद्योजक

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला १ लाख मराठा उद्योजक घडविण्याचा टप्पा पूर्ण करण्यात यश आले आहे. महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थींची संख्या १ लाख १४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत विविध बँकांच्या माध्यमातून ८३२० कोटी रुपयांची कर्जे वितरीत केली असून ८३२ कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. 

राज्यातील मराठा समाजातील नागरिकांना स्वत:च्या व्यवसाय करता यावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  महामंडळाची पुनर्रचना करून महामंडळाला निधी उपलब्ध करून नरेंद्र पाटील यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली तेव्हापासून  विविध बँकांच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. कर्जावरील व्याजाची रक्कम महामंडळाच्या माध्यमातून बँकांना देण्यात येते. या माध्यमातून १ लाख उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. आता लाभार्थ्यांची संख्या १ लाख १४ झाली आहे. दुग्ध व्यवसायापासून ट्रान्सपोर्ट, इतर व्यवसाय उभारण्यासाठी समूह व वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

एक लाख उद्योजक घडविण्याचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा सत्कार करून महामंडळाच्या कामाचे कौतुक केले. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर १ लाख मराठा उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर शासनाचे अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे प्रमुख यांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले. - नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ.

 

Web Title: annasaheb patil corporation created one lakh entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.