अण्णासाहेब पाटील महामंडळ एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करणार
By नामदेव मोरे | Published: July 8, 2024 06:35 PM2024-07-08T18:35:46+5:302024-07-08T18:39:45+5:30
नरेंद्र पाटील यांची माहिती : मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजक घडविण्याचा टप्पा लवकरच पूर्ण केला जाणार आहे. याशिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मराठा समाजातीक कार्यकर्त्यांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीमध्ये नरेंद्र पाटील यांनी राज्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी समाजाच्या प्रश्नांवर चर्चा केली. महामंडळाच्या माध्यमातून लवकरच १ लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. महामंडळाचा लाभ मिळविताना पात्रता प्रमाणपत्र, बँकांच्या कर्जाविषयी येणाऱ्या अडचणी, उद्योगाची व्याप्ती वाढविणे याविषयी उपस्थित सदस्यांनी सूचना केल्या. मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली केस. सारथी, वसतीगृह, शिष्यवृत्ती, कुणबी व मराठा नाेंदीविषयी येणाऱ्या अडचणींवरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्या. समाजाच्या सर्व समस्यांविषयी निवेदन तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांना निवेदन देवून बैठकीचे आयोजीत करण्याचे या बैठकीत निश्चीत करण्यात आले.
या बैठकीला मराठा समाजाचे राजेंद्र कोंढरे, किरण गायकर, आबासाहेब पाटील, अनंत जाधव, मधुकर घारे, अर्जुन चव्हाण, प्रकाश देशमुख, दिपक पाटील, सुरज बर्गे व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील मराठा चळवळीतील कार्यकर्त्यांची पुणे किंवा नाशीक येथे बैठक आयोजीत करण्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.