नवी मुंबई : नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा २८ वा वर्धापन दिन गुरुवारी नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये साजरा करण्यात आला. नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त क्रांती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. शं. पा. किंजवडेकर हे होते.
या वर्धापन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ महिला व नागरिकांसाठी कॅरम, संगीत खुर्ची, वेशभूषा, कथाकथन, काव्य वाचन आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वय वर्षे ७५ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा व लग्नाला ५० वर्षे पूर्ण केलेल्या जोडप्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, उत्कर्ष ज्येष्ठ महिला मंडळाच्या रेखा वाळवेकर, माजी अध्यक्ष व्ही. एन. चापके, रामभाऊ देशपांडे, अण्णासाहेब टेकाडे, प्रकाश लखापते आदी उपस्थित होते.
तुमच्यात तरुणांना लाजवेल असा उत्साह आहे, वय हा फक्त आकडा असतो. उत्साह, प्रेरणा बाकी अबाधित असते, हे तुम्ही या सोहळ्यातून सिद्ध केलेत, असे प्रतिपादन क्रांती पाटील यांनी केले. तसेच त्यांनी संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अक्युप्रेशर, फिजिओथेरपी, रुग्णसेवा आदी विनामूल्य सेवांचा गौरव केला. दीपक दिघे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी दत्तात्रेय आंब्रे, प्रभाकर गुमास्ते, रणजित दीक्षित, नंदलाल बैनर्जी आदीनी परिश्रम घेतले.