नवी मुंबई : अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींची महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे १ एप्रिलपासून घोषित केलेला संप स्थगित केला आहे. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी १ एप्रिलपासून घोषित केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींची शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत मानधनवाढीच्या मुद्द्यावर विशेष चर्चा करण्यात आली.मानधन नियमितपणे मिळण्यासाठी आॅनलाइन प्रक्रि या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे व त्यानंतर मानधन आतासारखे थकणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. मदतनिसांची बढती, आहाराचा दर व अन्य काही प्रश्नांवर चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला. त्यात प्रामुख्याने सेवासमाप्ती लाभाच्या मुद्द्याचा समावेश होता. सकारात्मक चर्चेच्या पार्श्वभूमीवर कृती समितीने संप दोन महिने स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, सर्व कर्मचाऱ्यांना अंगणवाडीतील सर्व नियमित कामकाज चालू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी वार्षिक गोषवारा, सर्वेक्षण, पल्स पोलिओ इत्यादी कामे करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. संप स्थगित केल्यामुळे आधी ठरलेली जिल्हा व राज्य पातळीवरील आंदोलने रद्द करण्यात आली आहेत. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी माननीय सचिवांचीही भेट घेतली जाणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्षा माया परमेश्वर, कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील, कार्याध्यक्ष युवराज बैसाने हे उपस्थित होते. बैठकीत आमदार नीलम गोऱ्हे व विद्या चव्हाण यांचीदेखील उपस्थिती होती.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा घोषित संप स्थगित
By admin | Published: April 01, 2017 6:27 AM