रेशनकार्डवरील मोफत धान्याची घोषणा कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:12 PM2021-04-29T23:12:27+5:302021-04-29T23:12:37+5:30
कष्टकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण ; घोषणेला झाले १५ दिवस
नवी मुंबई : मिशन ब्रेक दि चेनअंतर्गत राज्य सरकारने १ मेपर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. या कालावधीत सर्वसामान्यांची गैरसोय होवू नये, यादृष्टीने काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. परंतु, विविध कारणांमुळे ही योजना केवळ कागदावरच सीमित राहिल्याचे दिसून आले आहे.
राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भात १६ एप्रिल रोजी अधिकृत आदेश जारी केले होते. त्यानुसार दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या होत्या. मात्र, पंधरा दिवस उलटून गेले तरी नवी मुंबईतील काही मोजक्याच शिधावाटप दुकानात या योजनेअंतर्गत धान्य वाटप सुरू असल्याचे दिसून आले आहे. परंतु, बहुतांश दुकानांत ही योजना सुरू नसल्याने गरजूंची परवड होताना दिसत आहे.
कोरोना संसर्ग वाढत असल्याने लागू केलेल्या कडक निबंर्धांच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्यांना मदत म्हणून प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहे. परंतु, पंधरा दिवस उलटले तरी याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कष्टकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.