सिडकोचा आणखी एक विक्रम, ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण
By कमलाकर कांबळे | Published: August 28, 2022 07:40 PM2022-08-28T19:40:44+5:302022-08-28T19:46:41+5:30
मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृहबांधणी क्षेत्रात नवीन विक्रम
नवी मुंबई: मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृहबांधणी क्षेत्रात नवीन विक्रम करणाऱ्या सिडकोने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. तळोजा येथे सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पात अवघ्या ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण करून सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात आणखीन एक विक्रम आपल्या नावावार कोरला आहे. सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या योजनेतील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे घरांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्यावर सिडकोचा भर आहे. यापूर्वी मिशन 96 अंतर्गत प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सिडकोने बामणडोंगरी येथे केवळ ९६ दिवसांत ९६ सदनिकांचा समावेश असलेल्या १२ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे.
सिडकोने केलेल्या या कामाचे जगभरातून कौतूक झाले होते. त्यानंतर प्रीकास्ट याच तंत्रज्ञानाचा वापर करीत सिडकोने तळोजा सेक्टर २८, २९, ३० आणि ३७ मध्ये उभारण्यात येत इमारतींच्या ५०० स्लॅबचे काम अवघ्या ४८९ दिवसांत पूर्ण करून गृहनिर्माण क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व सिध्द केले आहे. दिवसाला १.०२ स्लॅब या विक्रमी वेगाने, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करता सिडकोने हे काम पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोचे वास्तुशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभियंते आणि प्रकल्प सल्लागारांसह इतर संबधित घटकांचे ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे. दरम्यान, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. हे करीत असताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
एकूणच सर्वसामान्यांना कमी कालावधीत दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिडकोने उचलेले हे सकारात्मक पाउल आहे. ५०० स्लॅबचे केवळ ४८९ दिवसांत पूर्ण केलेले बांधकाम हे या उद्दिष्टातील मिशन ९६ नंतरचा पुढील टप्पा असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.