नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृह प्रकल्पात यशस्वी ठरलेल्या, परंतु आतापर्यंत घराचा एकही हप्ता न भरलेल्या अर्जदारांना सिडकोने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. संबंधित अर्जदारांनी हप्ते भरण्याची तयारी दर्शविल्यास त्यांचे रद्द झालेले घर पुन्हा मिळणार आहे. या संदर्भात सिडकोने संबंधित अर्जदारांना मेसेज पाठविला असून, ६ नोव्हेंबरपर्यंत याबाबत आपला होकार किंवा नकार कळविण्याचे आवाहन केले आहे. सिडकोच्या या निर्णयाचा जवळपास १,७00 अर्जदारांना फायदा होणार आहे. सिडकोच्या माध्यमातून २0१८ मध्ये पंधरा हजार घरांची योजना जाहीर करून सोडत काढण्यात आली होती. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर अर्जदारांच्या अडचणीत लक्षात घेऊन सिडकोने सदनिकांचे हप्ते भरण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ दिली. तथापि, काही अर्जदारांनी आतापर्यंत सदनिकेचा एकही हप्ता भरला नसल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले. त्यामुळे सदर अर्जदार हे हप्ता भरण्यास व सदनिका घेण्यास इच्छुक नाहीत, असे गृहीत धरून त्यांच्या सदनिका पुढील संगणकीय सोडतीमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. त्यानुसार, २९ सप्टेंबर रोजी नियोजित एकही हप्ता न भरलेल्या जवळपास १,७00 सदनिकांचे वाटपपत्र सिडकोने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. सिडकोच्या या निर्णयाला विविध स्तरातून विरोध झाला.लाभार्थी अर्जदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १९ ऑक्टोबर रोजी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांची भेट घेऊन घरे रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार, सिडकोने नियोजित एकही हप्ता न भरलेल्या सोडतधारकांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.दरम्यान, मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सिडकोच्या निर्णयाचे स्वागत केले.
...तर पुढील योजनेत समावेशघरे रद्द करण्यात आलेल्या सोडतधारकांनी ६ नोव्हेंबरपर्यंत हप्ते भरण्यास इच्छुक आहोत की नाही, हे कळविणे आवश्यक आहे. जे अर्जदार प्रतिसाद देणार नाहीत, त्यांच्या घरांचे वाटप रद्द करून त्यांचा पुढील संगणकीय सोडतीमध्ये समावेश केला जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.