नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीपाठोपाठ पनवेलच्या ग्रामीण भागातदेखील अँटिजन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवार, ३ सप्टेंबरपासून चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
तालुक्यातील नेरे, अजिवली, आपटा, वावंजे, गव्हाण या प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजन टेस्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर उलवे सिडको नागरिक आरोग्य केंद्रातदेखील प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. नुकतेच गणेश विसर्जन झालेले आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढू लागले असल्याचे दिसून येत आहे. पनवेलच्या ग्रामीण भागात दिवसाला १००हून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत तर महापालिका हद्दीत ही आकडेवारी दिवसाला अडीचशेपर्यंत पोहोचलेली आहे.
ग्रामीण भागात अँटिजन टेस्टला सुरुवात झालेली असल्याने नागरिकांनी ताप, थंडी किंवा सर्दी झाली असल्यास ताबडतोब टेस्ट करावी, असे आवाहन केले जात आहे. अँटिजन टेस्टसाठी ३ हजार किट प्राप्त झालेल्या आहेत. यापैकी एकूण घेतलेल्या टेस्ट ३७१ असून २३ पॉझिटिव्ह आणि ३४८ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. अद्याप या अँटिजन टेस्टला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये त्याविषयीची जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.