एपीएमसी-कोपरीत लवकरच चार धूळक्षमण यंत्र; रहिवाशांच्या आंदोलनाने महापालिका नरमली
By कमलाकर कांबळे | Published: November 8, 2023 08:18 PM2023-11-08T20:18:58+5:302023-11-08T20:20:08+5:30
वाशी सेक्टर २६. २८ तसेच कोपरी आणि कोपरखैरणेगाव आणि परिसरात प्रदूषण वाढले आहे.
नवी मुंबई : वायूप्रदूषणामुळेनवी मुंबईकर हैराण झाले आहेत. त्याविरोधात नागरिकांनी स्वच्छ हवा हा माझा अधिकार याअंतर्गत आंदोलन सुरू केले आहे. मागील पाच आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची महापालिकेने दखल घेतली असून, प्रदूषण नियंत्रणासाठी एपीएमसी आणि कोपरी परिसरात चार धूळक्षमण यंत्र कायस्वरूपी बसविण्याचे अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी स्थानिकांची भेट घेऊन दिले. तर प्रभावी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. असे असले तरी जोपर्यंत प्रदूषण कमी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार रहिवाशांनी केला आहे.
वाशी सेक्टर २६. २८ तसेच कोपरी आणि कोपरखैरणेगाव आणि परिसरात प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी मागील पाच आठवड्यांपासून स्वच्छ हवा हा माझा अधिकार या मोहिमेअंतर्गत प्रत्येक रविवारी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याची दखल घेऊन महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी बुधवारी येथील रहिवाशांची भेट घेऊन चर्चा केली. नवी मुंबई विकास अधिष्ठानचे अध्यक्ष संकेत डोके यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी आरदवाड यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
खडी साठवणूक डेपोचे होणार स्थलांतर
या वेळी चर्चेत कोपरी पुलाखाली रेल्वे रुळाशेजारी असलेल्या खडी साठवणूक डेपोचे स्थलांतरण करणे, कोपरी गाव व कोपरखैरणे सेक्टर ११ मधून जाणाऱ्या नाल्यातील दुर्गंधी रोखण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन आरदवाड यांनी रहिवाशांना दिले. तसेच या प्रक्रियेत नागरिकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. या वेळी बाळासाहेब माने, अशरफ शेख, प्रो. विनील सिंग, दीप्ती घाडगे उपस्थित होते.