नवी मुंबई : ‘एपीएमसी’मधील शौचालय घोटाळा प्रकरणी पोलिसांनी संचालक संजय पानसरेंना अटक केली आहे. साडेसात कोटींच्या शौचालय ठेका घोटाळ्यात त्यांचेही नाव चर्चेत होते. पानसरेंच्या अटकेनंतर बाजार समितीचे संचालक असलेले सातारा लोकसभा मतदासंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवीत असलेले आ. शशिकांत शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एपीएमसी आवारातील शौचालयाच्या ठेक्यात साडेसात कोटींचा अपहार झाल्याचा ठपका ठेवून या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात पोलिसांनी ठेकेदारासह तिघांना अटक केली होती, या प्रकणाचा तपास सुरू असताना मंगळवारी रात्री संचालक संजय पानसरे यांना चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीअंती त्यांनाही अटक करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंतची पोलिस कोठडी मिळाली आहे.
इतर संचालकही येणार अडचणीत?या प्रकरणात सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवीत असलेले बाजार समितीचे संचालक आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ आणि इतर अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. यामुळे पुढील काही दिवसांत इतरांनाही अटकेची सूत्रे हलणार असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदेंपुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संस्थेशी आर्थिक लागेबांधे असल्याचा संशयसंजय पानसरे यांनी निर्मला औद्योगिक संस्थेचे मासिक भाडे ६१ हजार रुपये इतके असताना ते ८ हजार रुपये इतके कमी करण्याच्या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. तसेच संस्थेशी त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय आहे.