एपीएमसीत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू, १८ संचालकांची होणार निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 06:18 AM2020-01-28T06:18:18+5:302020-01-28T06:18:27+5:30
राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. २७ पैकी १८ संचालकांची मतदानाद्वारे निवड केली जाणार असून त्यामध्ये १२ शेतकरी प्रतिनिधींचा समावेश आहे. सोमवारपर्यंत २६९ जणांनी अर्ज घेतले असून ६७ जणांनी प्रत्यक्षात अर्ज भरले आहेत.
राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. वर्षाला जवळपास १० हजार कोटी रुपयांची उलाढाल येथील पाच मार्केटमधून होत असून १ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. बाजार समितीची यापूर्वीची निवडणूक २००८ मध्ये झाली होती. डिसेंबर २०१३ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली. परंतु या कालावधीमध्ये पुन्हा निवडणुका न घेता आल्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. यानंतरही निवडणुका न झाल्यामुळे शासनाने बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. पाच वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीनंतर न्यायालयाच्या आदेशावरून निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीवर एकूण २७ जणांचे संचालक मंडळ असते, त्यापैकी १८ जणांची मतदानाद्वारे निवड केली जाते. यामध्ये १२ शेतकरी प्रतिनिधी, पाच व्यापारी व एका कामगार प्रतिनिधीचा समावेश आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी २९ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत तब्बल २६९ जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. २४ व २५ जानेवारीला ६ जणांनी व २७ जानेवारीला ६१ जणांनी असे एकूण ६७ जणांनी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज भरणारांमध्ये माजी मंत्री शशिकांत शिंदे, भाजी मार्केटचे माजी संचालक शंकर पिंगळे व कांदा मार्केटचे अशोक वाळूंज यांचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांमध्ये अजून किती जणांचे अर्ज दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मुंबई बाजार समिती ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्था आहे. येथील संचालकांना राज्यभर मान मिळत असतो. यामुळे संचालक पदावर निवडून येण्यासाठी व सभापती व उपसभापती होण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये वर्चस्व असते. आतापर्यंत काँगे्रस व राष्ट्रवादीचे संस्थेवर वर्चस्व राहिले आहे. सहा महसूल विभागांमधून प्रत्येकी दोन याप्रमाणे १२ शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. त्या महसूल विभागामधील बाजार समित्यांचे संचालक यासाठी मतदार असतो. शेतकरी प्रतिनिधींनाच सभापती व उपसभापती होता येते. मुंबईचे धान्य कोठार म्हणूनही या संस्थेची ओळख असल्यामुळे त्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी या वेळीही सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
असे असते संचालक मंडळ
मुंबई बाजार समितीवर २७ जणांचे संचालक मंडळ असते. यापैकी सहा महसूल विभागामधील प्रत्येक दोन याप्रमाणे १२ सदस्य असतात, बाजार समितीच्या पाच मार्केटमधील प्रत्येकी एक प्रतिनिधी व कामगारांचा एक प्रतिनिधी असतो. या १८ जणांची मतदानाद्वारे निवड केली जाते. उर्वरित ९ पैकी पाच शासन नियुक्त संचालक, मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रत्येकी एक संचालक, पणन संचालक व बाजार समिती सचिव असे एकूण २७ संचालक असतात.
माजी मंत्रीही निवडणूक रिंगणात
मुंबई बाजार समितीची निवडणूक राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची समजली जाते. यापूर्वी कुमार गोसावी व रामप्रसाद बोर्डीकर या दोन आमदारांनी सभापतीपद भूषविले आहे. नाशिकचे देवीदास पिंगळे हे खासदार असताना बाजार समितीचे संचालक होते. माजी मंत्री शशिकांत शिंदे हे कॅबिनेट मंत्री असतानाही बाजार समितीचे संचालक होते. या वेळीही शिंदे हे निवडणूक रिंगणात आहेत. या वेळी किती आमदार रिंगणात राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाजार समितीला आले महत्त्व : यापूर्वीच्या निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरण्याची सुविधा त्या - त्या महसूल विभागामध्ये करण्यात आली होती. बाजार समितीमध्ये फक्त व्यापारी व कामगार प्रतिनिधीच अर्ज भरत होते. परंतु या वेळी सर्वांना अर्ज भरण्यासाठी मुंबई बाजार समितीमध्येच सोय केली आहे. यामुळे बाजार समितीला विशेष महत्त्व आले असून राज्यभरातून उमेदवार व त्यांचे समर्थक अर्ज भरण्यासाठी येत आहेत.