एपीएमसीत पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:56 AM2017-08-05T02:56:38+5:302017-08-05T02:56:38+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नाही.
नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नाही. यामुळे मार्केटच्या बाहेरील मुख्य रोडवर वाहने उभी केली जात असून त्यामुळे प्रचंड वाहतूककोेंडी होवू लागली आहे. यामुळे नाल्यावर वाहनतळ विकसित करण्यात यावा, अशी मागणी व्यापाºयांनी केली असून पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडेही याविषयी निवेदन दिले आहे.
राज्यातील ३९५ बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. ७२ हेक्टर जमिनीवर कांदा, बटाटा, भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटच्या इमारती उभारल्या आहेत. मार्केटमध्ये रोज ३ ते ४ हजार ट्रकमधून कृषी मालाची आवक होते. तेवढ्याच वाहनांमधून माल मुंबई, नवी मुंबईमध्ये नेला जात आहे. पाच ते सहा हजार अवजड वाहनांनी या परिसरामध्ये ये-जा असते. याशिवाय व्यापारी, माथाडी कामगारांची पाच ते सहा हजार वाहनेही मार्केटमध्ये व मार्केटच्या बाहेर उभी केली जात आहेत.
वाहनांची संख्या प्रचंड वाढली असल्याने वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. परिणामी अन्नपूर्णा चौक ते माथाडी भवन, अन्नपूर्णा चौक ते तुर्भे स्मशानभूमी, विस्तारित भाजी मार्केट, एसटी, डेपोकडील रोडवर मोटारसायकल व इतर वाहने मोठ्या प्रमाणात उभी करण्यात येत आहेत. मार्केट आवारामध्ये मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने कृषी माल घेवून येणारी व माल घेवून जाणाºया वाहनांना जागाच उपलब्ध होत नाही. रोजच्या वाहतूककोेंडी व अपघातामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. वाहतूककोंडी फोडण्यासाठी नवीन वाहनतळ उभा करण्याची मागणी केली जात आहे. व्यापाºयांनी बाजार समिती प्रशासनाकडेही याविषयी मागणी केली आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.
महापालिका आयुक्तांनी गुरुवारी बाजार समितीला भेट दिली. वाहतूक पोलीस चौकी ते माथाडी भवनच्या रोडवर अनधिकृतपणे फेरीवाले बसत आहेत. या फेरीवाल्यांवर कारवाई करून सर्व्हिस रोड खाजगी वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा. मसाला व भाजी मार्केटच्या बाहेरील नैसर्गिक नाल्यावर स्लॅब टाकून दोन वाहनतळ विकसित करण्यात यावेत. यामुळे नाल्यामध्ये कोणी कचरा टाकणार नाही. कचºयामुळे होणारी दुर्गंधी थांबेल अशी सूचना व्यापाºयांनी केली आहे. नाल्यावर वाहनतळ विकसित झाला तर कार व दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पार्किंगचा प्रश्न सुटला नाही तर भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही व्यापाºयांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.