लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्यातील शिखर बाजार समिती स्वच्छतेमध्येही अग्रेसर राहावी यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. सहा दिवसांमध्ये तब्बल ३७५ टन कचरा उचलण्यात आला आहे. प्रसाधनगृहांसह इमारतीही स्वच्छ करण्यात आल्या असून ही मोहीम भविष्यातही सुरू ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरवात केली आहे. एपीएमसीचे मुख्य प्रशासक सतीश सोनी व सचिव शिवाजी पहिनकर यांनी स्वच्छता मोहिमेविषयी माहिती दिली. सहा मार्केट व मुख्यालयामध्ये ही मोहीम राबविण्यात आली. मार्केटमधील कचरा रोजच्या रोज उचलण्यात येतो. पण या मोहिमेच्या माध्यमातून नियमित कचऱ्यासोबत रस्ते, चढउतार करणाऱ्या पायऱ्या, प्रसाधनगृह, पाणपोई, सार्वजनिक वापराचे पॅसेज व इतर सर्व ठिकाणची विशेष स्वच्छता करण्यात आली. २ ते ८ मे दरम्यान ३७५ टन कचरा उचलण्यात आला आहे. हा सर्व कचरा महापालिकेच्या क्षेपणभूमीवर पाठविण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये एपीएमसीमधील व्यापारी, माथाडी, बाजार समितीचे कर्मचारी, वाहतूकदार व इतर घटकही सहभागी झाले होते. या मोहिमेच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेवून बाजार समिती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. भविष्यातही मार्केट आवार स्वच्छ रहावे यासाठी व्यापारी व बाजार समिती अधिकारी, कर्मचाऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत. ज्या ठिकाणी कचरा वेळेवर उचलण्यात आला नसेल तेथील छायाचित्र पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे. बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, एपीएमसीच्या कामकाजामध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले जात आहे. स्वच्छता अभियान संपल्यानंतरही नियमितपणे स्वच्छता राहील याकडे लक्ष दिले जात आहे. याशिवाय ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सर्वांना विश्वासात घेवून हे काम केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सष्ट केले. या मोहिमेमध्ये अधीक्षक अभियंता व्ही. बी. बिरादार, आर. आर. खिस्ते, अविनाश देशपांडे, बजरंग जाधव, एस. एन. कटकधोंड, एच. एल. घोलप व सर्व मार्केटमधील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
एपीएमसीने उचलला ३७५ टन कचरा
By admin | Published: May 09, 2017 1:35 AM