नवी मुंबई : प्लास्टीकमुक्त नवी मुंबई मोहिमेअंतर्गत पालिका प्रशासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री करणाºयांवर कारवाई सुरू केली आहे. एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये धाड टाकून १९५५ किलो प्लास्टीकचा साठा जप्त केला आहे.पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी प्लास्टीकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी जनजागृतीसोबतच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा साठा व विक्री करणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. यामुळे शहरभर धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी एपीएमसी भाजीपाला मार्केट येथे राहुल गुप्ता यांच्या गाळा क्रमांक डी ६४७ व कमलेश गुप्ता यांच्या ४५२ येथून तब्बल १९५५ किलो प्लास्टीक पिशव्यांचा साठा जप्त केला आहे. दोघांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे.अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली परिमंडळ एकचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व त्यांच्या सहकाºयांनी ही कारवाई केली आहे. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. शहर प्लास्टीकमुक्त करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्लास्टीकचा साठा व विक्री करणाºया व्यापाºयांनी प्लास्टीकचा वापर टाळण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे. नवी मुंबईकर नागरिकांनीही प्लास्टीक पिशव्यांचा वापर टाळावा व कागदी, कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
एपीएमसीत प्लास्टीक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:09 AM