एपीएमसी पुन्हा बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 04:08 AM2018-06-05T04:08:48+5:302018-06-05T04:08:48+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. २०१३ मध्ये संशयित अतिरेकी सापडल्यानंतरही प्रशासनाने सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

 APMC re-built criminals shelter | एपीएमसी पुन्हा बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान

एपीएमसी पुन्हा बनले गुन्हेगारांचे आश्रयस्थान

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. २०१३ मध्ये संशयित अतिरेकी सापडल्यानंतरही प्रशासनाने सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. येथे आश्रय घेतलेल्या दोघांनी महावितरणच्या गोडाऊनमधून केबल चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. सद्यस्थितीमध्ये दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार विनापरवाना मार्केटमध्ये मुक्काम करत असून एपीएमसीला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
वाशी सेक्टर १९ मधील वीज मंडळाच्या गोडाऊनमध्ये ३१ मे रोजी दोघांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. नटबोल्ट व एक्साब्लेडच्या सहाय्याने बंद ट्रान्सफॉर्मरमधील १० किलो कॉपर केबल काढली. केबल चोरी करून नेत असताना पोलिसांनी ईसराईल सत्तार शेख या आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केली असता तो मूळचा झारखंड राज्यातील साहेबगंज जिल्ह्यातील रहिवासी असून बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये रोजंदारीवर काम करत असल्याचे स्पष्ट झाले. पळून गेलेला आरोपी शिरअली खान हाही बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये काम करत आहे. आरोपी एपीएमसीमध्ये कोणाकडे काम करतात याविषयी माहिती घेण्यासाठी बाजार समिती प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु या कामगारांची नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. मार्केटमध्ये पाहणी केली असता दोन हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार मुक्काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बाजार समितीच्या नियमाप्रमाणे गोडाऊन बंद झाल्यानंतर कोणीही मार्केटमध्ये थांबू नये. येथे काम करणाऱ्या प्रत्येकाची नोंद बाजार समितीकडे असणे आवश्यक आहे. परंतु परप्रांतीय मजुरांची नोंद कोणाकडेच उपलब्ध नाही. या कामगारांच्या आडून गुन्हेगारही याठिकाणी आश्रय घेऊ लागले आहेत.
यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी मार्केटमध्ये सापडले आहेत. दहा वर्षांमध्ये २०० पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक झाली आहे. खून, दरोडे व चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींनाही अटक झाली आहे. भाजी व फळ मार्केटमध्ये गांजा विक्री केली जाते. आतापर्यंत या ठिकाणावरून हरिभाऊ विधाते, दत्ता विधाते, राजू घासवाला,पप्या, तुंडा यांना गांजा विक्रीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. यापूर्वी अतिरेकी कारवाईशी संबंधित असलेल्यांनाही या ठिकाणावरून अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी नकली नोटा चलनात आणणारे रॅकेटही या परिसरामध्ये कार्यरत होते.

अतिरेकीही सापडले होते
१६ जानेवारी २०१३ मध्ये मुंबई पोलिसांनी मस्जिदबंदरमधील रिलॅक्स गेस्ट हाउसमधून हिजबुल मुजाहिद्दीनचा संशयित अतिरेकी फारूख नायकू व मोहम्मद तालुकदार यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २७ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. यामधील नायकू याने एक वर्ष एपीएमसीच्या मसाला मार्केटमध्ये व्यापार केल्याचे स्पष्ट झाले होते. नायकू अनेक वेळा पाकिस्तानमध्ये जावून हिजबुलच्या कमांडरलाही भेटल्याचे स्पष्ट झाले होते. बाजार समिती प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

पोलिसांच्या
सूचनांकडे दुर्लक्ष
एपीएमसी पोलीस स्टेशनच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, बाजार समितीला यापूर्वीही अनेक वेळा नोटीस दिली आहे. येथे काम करणाºया व मुक्काम करणाºयांची नोंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु प्रशासन या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. मार्केटमध्ये कॅमेरेही बसविले जात नाहीत. पोलीस नियमित गस्त घालत असून कोणीही संशयित आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे सांगितले.

अमली पदार्थांचा व्यापार
बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये विनापरवाना वास्तव्य करणाºया अनेक कामगारांना अमली पदार्थांचे व्यसन आहे. त्यांना गांजा, गुटखासह इतर अमली पदार्थ पुरविणारी साखळीही या परिसरात कार्यरत आहे. यापूर्वी चार गांजा माफियांना येथून पोलिसांनी अटक केली आहे.

प्रशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यावर न्यायालयाचे निर्बंध आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. मार्केटमधील सुरक्षेच्या संदर्भात योग्य काळजी घेण्याच्या सूचना सचिवांना देण्यात येतील.
- सतीश सोनी, मुख्य प्रशासक, बाजार समिती

Web Title:  APMC re-built criminals shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा