नवी मुंबई : राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई एपीएमसीमध्ये २ ते ८ मे दरम्यान विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे. सर्वात स्वच्छ बाजार समिती बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानामध्ये व्यापारी व सर्व घटक यामध्ये सहभागी होणार आहेत. बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी एपीएमसीमधील कामकाज सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कृषी मालाचा व्यापार असल्याने सर्व मार्केट स्वच्छ असले पाहिजेत यावर भर दिला आहे. स्वच्छता असेल, तर नागरिकांना चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध करून देता येणार आहे. यामुळेच २ मेपासून पाचही मार्केटसह विस्तारित मार्केटमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये अडते, व्यापारी, हमाल, मापाडी, माथाडी, वाहतूकदार व इतर सर्व घटकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. मार्केट आवारामधील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, विंगनिहाय चढ-उतार करणारे पायथे यांची साफसफाई केली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक विंगमधील कॉमन पॅसेज पाण्याने स्वच्छ करण्यात येणार आहेत. बाजार आवारातील सार्वजनिक प्रसाधनगृहांची साफसफाई व सर्वत्र धुरीकरणासह औषध फवारणीही केली जाणार आहे. दुर्गंधीनाशक कार्बोलिक पावडरचा शिडकावही करण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानामध्ये मार्केटमधील ६ ठेकेदारांकडील २७५ कर्मचारी, महापालिकेचे ३५० कर्मचारी, विविध बाजार आवारामधील व्यापारी व इतर सर्व घटक मिळून सफाई करणार आहेत. याशिवाय ३ जेसीबी, ५ कॉम्पॅक्टर्स, २५ वॉटर टँकर्स, दोन जेट स्प्रे मशिनचा उपयोग होणार आहे. सात दिवसांमध्ये ४५० मेट्रिक टन कचरा निघेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच अभियान राबविले जात आहे. प्रशासक सतीश सोनी, सचिव शिवाजी पहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश देशपांडे, बजरंग जाधव, सतीश कटकधोंड, किरण घोलप, सय्यद झुल्फेकार, शिवाजी खापरे स्वत: अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
एपीएमसीत स्वच्छता अभियान
By admin | Published: May 02, 2017 3:31 AM