एपीएमसीत सुरक्षा व्यवस्थेचा बाजार
By admin | Published: February 3, 2017 02:53 AM2017-02-03T02:53:35+5:302017-02-03T02:53:35+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचाच बाजार मांडला आहे. सुरक्षेच्या नावाखाली वर्षाला ४ कोटींपेक्षा जास्त खर्च होत आहेत. पण सुरक्षा अधिकारी
- नामदेव मोरे, नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचाच बाजार मांडला आहे. सुरक्षेच्या नावाखाली वर्षाला ४ कोटींपेक्षा जास्त खर्च होत आहेत. पण सुरक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळेच येथील सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदली, नियुक्तीपासून प्रत्येक गोष्टीत अर्थकारणाला प्राधान्य दिले जात आहे. व्यापाऱ्यांकडून पैसे वाचविण्यासाठी व प्रशासकीय यंत्रणा मिळविण्यासाठी बांगलादेशी नागरिकांपासून हिजबुल मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनाही मार्केटमध्ये नोकरी, व्यवसाय करण्यासाठी अभय दिले जात आहे.
मुंबई गुन्हे शाखेने १६ जानेवारी २०१३ मध्ये मस्जिदबंदरमधील रिलॅक्स गेस्ट हाऊसमधून हिजबुल मुजाहिदीनचे अतिरेकी फारूख नायकू व मोहम्मद तालुकदार यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २७ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या. तपासामध्ये नायकू हा जवळपास एक वर्ष मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये सुका मेव्याचा व्यापार करत असल्याचे निदर्शनास आले होते. तो काश्मीरमधील हिजबुल मुजाहिदीनच्या संपर्कात होता. तो व तालुकदार व्यवसायाच्या बहाण्याने बाजार समिती परिसरामध्ये नकली नोटा चलनात आणत होते. याशिवाय मुंबई व परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करून त्याची माहिती पाकिस्तानातील यंत्रणेला देत असल्याचे निदर्शनास आले होते. नायकू अनेक वेळा पाकिस्तानमध्ये गेला होता व तेथील हिजबुलच्या कमांडरलाही भेटला होता.
संगणकाचे चांगले ज्ञान असल्याने तो ई-मेल व इतर मार्गाने सीमेपलीकडच्या अतिरेक्यांच्या म्होरक्यांशी संपर्क साधत होता. बाजारसमितीमध्ये वर्षभर व्यवसाय करूनही या अतिरेक्यांची माहिती येथील सुरक्षा व्यवस्थेला व प्रशासनाला कळाली नव्हती. ढिसाळ सुरक्षा यंत्रणेमुळेच अतिरेकी व गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेले अनेक गुंड बिनधास्तपणे एपीएमसीच्या विविध मार्केटमध्ये कार्यरत आहेत. भाजी व फळ मार्केटतर बांगलादेशी नागरिकांचे सर्वात सुरक्षित निवासस्थान बनले आहे. २० वर्षांत जवळपास ५०० संशयित ताब्यात घेतल्यानंतरही विनापरवाना वास्तव्य करणाऱ्यांना आश्रय देण्याचे धोरण सुरूच आहे.
देशातील सर्वाधिक सुरक्षा रक्षक असलेल्या बाजारसमित्यांमध्ये मुंबई बाजारसमितीचा समावेश आहे. स्वत:चे जवळपास ६४ रखवालदार व सुरक्षा रक्षक मंडळाचे २५० कर्मचारी आहेत. याशिवाय मार्केट परिसराच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन, मार्केटमध्येच पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक, सहाय्यक आयुक्त वाशी व गुन्हे शाखा युनिट एकचे कार्यालय आहे. एवढी मोठी यंत्रणा असतानाही सर्वात जास्त गुन्हेगार याच परिसरात वास्तव्य करत आहेत. प्रशासन सुरक्षेचा फक्त दिखावा करत असून संस्थेच्या तिजोरीवरच डल्ला मारण्याचे काम सुरू आहे. वर्षाला सुरक्षेसाठी ४ कोटी रुपयांचा खर्च होत आहे. अवैध कामांना अभय देवून पैसे वसुलीसाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वापर केला जात असून या विभागावर कोणाचाही वचक राहिलेला नाही.
सुरक्षेपेक्षा वसुलीला प्राधान्य
सुरक्षा अधिकारी व कर्मचारी मार्केटच्या सुरक्षेपेक्षा वसुलीवर भर देवू लागले आहेत. गेटवर नियुक्ती करण्यापासून इतर सर्व ठिकाणांवरून कोठून काय मिळणार याचाच विचार होत आहे. मार्केटमध्ये अनधिकृतपणे वाहने उभी करण्यासाठी परवानगी देण्यापासून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना अभय देण्यासाठीही पैसे घेतले जात आहेत. बांधकाम साहित्य आतमध्ये सोडण्यापासून पानटपऱ्यांवर गुटखा विक्रीसाठीही परवानगी दिली जात आहे. मिळालेल्या महसुलामधून कोणाला किती द्यावे लागतात याची उघड चर्चा मार्केटमध्ये सुरू असते.
सुरक्षा विभागावर
वचक नाही
बाजार समितीच्या सुरक्षा विभागावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त कर्नल अविनाश काकडे यांची नियुक्ती केलेली आहे. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यात त्यांना अपयश आले आहे. प्रत्येक मार्केटला तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सवता सुभा सुरू असून त्यांचे रिपोर्टिंग थेट सचिवांना होवू लागले आहे.
पोलीस यंत्रणाही सुस्त
एपीएमसीची धर्मशाळा झाली असून येथे बांगलादेशींपासून अतिरेक्यांपर्यंत अनेक गुन्हेगारांनी आश्रय घेतल्याचे उघड झाले आहे. गुप्तचर विभागानेही अहवालामध्ये येथील प्रकाराविषयी गंभीर अहवाल दिले आहेत. एपीएमसी पोलीस व वरिष्ठांनी बाजार समितीला ओळखपत्राशिवाय कोणाला प्रवेश देवू नये असे आदेश दिले आहेत, पण प्रत्यक्षात काहीच कारवाई झालेली नाही.
अतिरेक्यांना अभय
बाजार समितीच्या मसाला मार्केटमध्ये फारूख नायकूने आश्रय घेतला होता. गांजा माफिया टारझन ऊर्फ हरिभाऊ विधाते व दत्ता विधाते, गांजा विक्रेता पप्या, तुंडा हे सर्व बाजार समितीमध्ये वर्षानुवर्षे व्यवसाय करत होते.