एपीएमसीत हापूसला मिळतेय ‘गोड’ वागणूक; आंबा व्यवस्थापनासाठी यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 08:22 AM2024-03-13T08:22:34+5:302024-03-13T08:22:47+5:30
वाहतूककोंडी टाळण्यासाठी तयार केली नियमावली
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये चार महिने आंब्याचे वर्चस्व असते. हंगाम काळात वाहतूककोंडी टाळण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या योग्य नियोजनासाठी व्यापारी संघटना व प्रशासनाने विशेष नियमावली तयार केली आहे.
आंब्याची आवक विनाअडथळा होण्यासाठी स्वतंत्र गेट निश्चित करून कलिंगड, टरबूजसारख्या फळांना दुपारी तीननंतर मार्केट प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये वर्षभर रोज २५० ते ३०० वाहनांची आवक होत असते. परंतु आंबा हंगामात रोजची आवक ६०० ते ७०० वाहनांवर पोहोचते. सद्य:स्थितीमध्ये प्रतिदिन ५०० पेक्षा जास्त वाहनांची आवक सुरू आहे. १५ मार्चनंतर आंब्याची आवक प्रचंड वाढण्याचा अंदाज आहे.
व्यापाऱ्यांना संघटनेचे आवाहन
हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. बाजार समिती प्रशासनानेही आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. आंब्याच्या सर्व वाहनांना गेट क्रमांक ३ मधून मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, तर माल घेऊन येणाऱ्या फळांची गाडी चार तासांपेक्षा जास्त काळ मार्केटमध्ये उभी राहणार नाही, याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत. व्यापाऱ्यांची खासगी वाहने गेट क्रमांक पाचमधून आत येण्याची व्यवस्था केली आहे.
दहा दिवसांत दोन लाख दंड
आंबा हंगामासाठी नियमावली निश्चित केल्यानंतर वाहनांमध्ये व मोकळ्या पॅसेजमध्ये व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. दहा दिवसांमध्ये दोन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
‘या’ वेळात आणा कलिंगड, टरबूज
कलिंगड, टरबूजचे ट्रक दुपारी ३ ते रात्री ११ या कालावधीमध्ये मार्केटमध्ये आणण्याच्या सूचना आहेत. वाहतूककोंडीचे नियोजन करण्यासाठी जादा सुरक्षारक्षकही तैनात केले जाणार आहेत. वाहनांमध्ये व्यापार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या सूचना
दिल्या आहेत.
आंबा हंगामामध्ये वाहनांची संख्या वाढते. या कालावधीमध्ये व्यापार सुरळीत व्हावा, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. नियमांचे पालन करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. - संगीता अढांगळे, उपसचिव, फळ मार्केट