नवी मुंबई : एपीएमसीच्या मध्यवर्ती सुविधा केंद्राच्या इमारतीचे बेकायदेशीर गोडाऊन बनत चालले आहे. बंद गाळ्यांच्या बाहेर पुठ्यांचे ढीग, तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात साठवण्यात आले आहेत. या वरून इमारतीच्या सुरक्षेत हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत असून भविष्यात त्या ठिकाणी मोठ्या दुर्घटनेचीही शक्यता नाकारता येत नाही.एपीएमसी प्रशासनाने फळ मार्केटमध्ये मध्यवर्ती सुविधा केंद्राची प्रशस्त इमारत उभारली आहे. वर्षभरापूर्वीच इमारतीचे नूतनीकरणही झालेले आहे. सद्यस्थितीला या सात मजली इमारतीमध्ये बोर्डाची कार्यालये, बँक, पतपेढ्या, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे कार्यालय याशिवाय इतरही अनेक कार्यालये आहेत. तर इमारतीच्या तळाशी व्यावसायिक गाळे असून, काही सुरू तर उर्वरित बंद स्थितीत आहेत. त्यापैकी बंद गाळ्यांबाहेरची जागा गोडाऊन म्हणून वापरली जातात. त्या ठिकाणी काही व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्यांचे ढीग साठवण्यात आले आहेत. यामुळे कामानिमित्ताने इमारतीमध्ये ये-जा करणाºयांच्या मार्गात अडथळा होत आहे. तर काही ठिकाणी प्लॅस्टिकचे रिकामे क्रेटही साठवण्यात आलेत. अशा प्रकारांमुळे जागोजागी गोडाऊन तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, असे गोडाऊन भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.
एपीएमसीचे मध्यवर्ती सुविधा केंद्र बनले गोदाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 10:52 PM