आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव, अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान!  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:11 PM2023-04-16T12:11:54+5:302023-04-16T12:12:51+5:30

नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. 

Appasaheb Dharmadhikari was felicitated with 'Maharashtra Bhushan' award, awarded by Amit Shah in Navi Mumbai | आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव, अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान!  

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव, अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान!  

googlenewsNext

नवी मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. तसेच, या कार्यक्रमासाठी अनेक श्री सदस्यांनी उपस्थिती लावली. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रायगडमधील रेवदंडा येथील निवास्स्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदीर्घ काळापासून करत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचे कार्य त्यांच्याकडून गेली अनेक वर्षे सुरू आहे. 

दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेत. याशिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मोठा वाटा आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन करण्याचा मोठा उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहिरींमधील गाळ काढून स्वच्छ करणे, यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार आहे.

नानासाहेब धर्माधिकारीही महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
२००८ मध्ये राज्य सरकारकडून ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये २०१० मध्ये नोंदही करण्यात आली होती.  

पिण्याचे पाणी अन् फिरते शौचालय
या सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. जवळपास २५० टँकर आणि २१०० नळ बसविण्यात आले. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली. यात  ६९ रुग्णवाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरते शौचालय, ४२०० पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालय बांधण्यात आली. पार्कींगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले.

Web Title: Appasaheb Dharmadhikari was felicitated with 'Maharashtra Bhushan' award, awarded by Amit Shah in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.