नवी मुंबई : राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. खारघर येथे रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळ सदस्यांसह राज्यभरा आमदार, खासदार आणि काही उद्योजक उपस्थित राहणार आहेत. या व्हीआयपींना कार्यक्रमस्थळी पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी खारघर येथे आठ हेलिपैड उभारण्यात आले आहेत.
या कार्यक्रमासाठी २० लाखांच्या आसपास श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. श्री सदस्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासन, नवी मुंबई महापालिका, सिडको आणि पनवेल न महापालिकेसह नवी मुंबई पोलिस आठवडाभरापासून मेहनत घेत आहेत. वेस्ट, एनएमएमटी, टीएमटी आणि केडीएमटीच्या ११०० हून अधिक बसची सोय केली आहे, याशिवाय पार्किंग झोनची सोय केली आहे. १८ लाख ३६ हजारांवर आसनव्यवस्था तयार ठेवली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केवळ प्रशासकीय यंत्रणाच नव्हेतर, मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी जातीने लक्ष ठेवून असून, वेळोवेळी आढावा घेतला आहे.
पिण्याचे पाणी अन् फिरते शौचालयया सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २५० टँकर आणि २१०० नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून ६९ रुग्णवाहिका, ३५० डॉक्टर्स, १०० नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. ३२ फिरते शौचालय, ४२०० पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी ९००० तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी ६० जेटींग मशीन, ४००० सफाई कर्मचारी शिवाय २६ अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ६०० स्वयंसेवक, २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
आप्पासाहेब शनिवारीच नवी मुंबईत दाखलज्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात येणार आहे, त्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे शनिवारीच नवी मुंबईत कुटुंबासह आगमन झाले. त्यांचे उपस्थित लोकप्रतिनिधींनी जल्लोषात स्वागत केले.
अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदखारघर शहरासह नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व प्रमुख मार्गाच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मुंबई- गोवा महामार्गासह सर्वच मार्गावर शनिवारी दुपारी दोन वाजेपासून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीसकाळी साडे दहाच्या सुमारास या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.