नवी मुंबई - मराठी तरुणांनी व्यवसाय करण्याची जिद्द मनात बाळगली पाहिजे. भांडवल नसेल तर सुरवातीला छोटा व्यवसाय सुरू करावा. मेहनत घेतली तर स्टॉल्सचे रूपांतर मॉलमध्ये व टपरीचे रूपांतर फॅक्टरीमध्ये करणे सहज शक्य असल्याचे मत प्रा. नामदेव जाधव यांनी व्यक्त केले आहे.रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य राहिलेल्या प्रा. भास्करराव थोरात यांच्या ६ व्या पुण्यस्मरणार्थ कोपरखैरणे येथील शेतकरी समाज सभागृहात आयोजित कार्यक्रमात जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले की, परवानाधारक दुकाने किंवा गाळे वाटप करण्यासाठी परवानगी देताना त्यातील ८0 टक्के दुकाने किंवा गाळे हे मराठी माणसांसाठीच राखीव ठेवले पाहिजेत. गाळे कितीही किमतीला गेले तरी परप्रांतीयांना विकले गेले नाही पाहिजेत. एक मराठी माणूस स्वत: दुकान चालवेल किंवा दुसऱ्या मराठी माणसाला भाड्याने देईल अशी यंत्रणा राज्य शासन किवा महापालिकांनी राबवायला सुरुवात करावी. नोकरीपेक्षा उद्योग सुरू करण्यास तरुणांनी प्राधान्य द्यावे. उद्योगाने सुरवातीला चार-पाच मराठी तरु णांना रोजगार मिळेल व अशाच संख्येने जर पुढे गेलो तरच मुंबईत मराठी तरु णांना उभे राहता येईल.‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व प्रभात चॅरिटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केल्याचे सांगितले. प्रास्ताविक आयोजक डॉ.प्रशांत थोरात यांनी केले. यावेळी सेवाभावी वृत्तीने गोरगरिबांची सेवा करणाºया प्रभात चॅरिटेबल ट्रस्टला डॉ. प्रकाश शेंडगे यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. सरोजिनी नायर आणि अशोक भांगले यांच्या निधनानंतर त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता. अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी यासाठी या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर होते. कार्यक्रमाचा शुभारंभ माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, प्राध्यापक राजेंद्र कुंभार, ज्ञानविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.पी.सी.पाटील, डॉ. प्रकाश शेंडगे, डॉ.नरेंद्र उपाध्याय, नगरसेवक रामदास पवळे, घनश्याम मढवी, एकनाथ पाटील, केशव म्हात्रे, दीपक पाटील, जयश्री पाटील, आत्माराम पाटील, नितीन म्हात्रे, शाहीर रूपचंद चव्हाण, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. आर.एन.पाटील, अरुण खुरे, डॉ.विनायक म्हात्रे आदी उपस्थित होते.
मराठी तरुणांनी उद्योजक होण्याची जिद्द बाळगावी, नामदेव जाधव यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 3:41 AM