नवी मुंबईची जुनी छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:52 AM2019-11-14T01:52:21+5:302019-11-14T01:52:35+5:30
आगामी वर्ष हे सिडकोचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
नवी मुंबई : आगामी वर्ष हे सिडकोचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त सिडकोतर्फे दिनदर्शिका, कॉफी टेबल बुक, माहितीपुस्तिका यांचे प्रकाशन तसेच नवी मुंबईच्या जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन आदी विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील जुने रहिवासी, विविध संस्था, पत्रकार, छायाचित्रकार यांनी त्यांच्या संग्रही असलेली नवी मुंबई जुनी छायाचित्रे सिडकोला पाठविण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.
मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबई विकसित करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने १७ मार्च १९७० रोजी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोची स्थापना करण्यात आली. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील ठाणे, पनवेल व उरण तालुक्यांतील ९५ गावांतील ३४४ चौ. कि.मी. क्षेत्रफळाची जमीन संपादित करून नवी मुंबईची उभारणी करण्यात आली. नवीन शहर हे सर्व प्रकारच्या पायाभूत नागरी सामाजिक आणि सांस्कृतिक सुविधांनी परिपूर्ण असेल, या दृष्टीने सिडकोने नवी मुंबईचे नियोजन केले. आपल्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत सिडकोने नगर विकास क्षेत्रात आदर्श ठरतील, असे अनेक प्रकल्प राबविले. तर वर्तमानात सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ प्रभावीत क्षेत्र (नैना), मेट्रो, नेरुळ-उरण उपनगरी रेल्वे, कॉर्पोरेट पार्क यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतिपथावर आहेत.
सिडकोच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबईच्या विकासातील विविध टप्पे दर्शविणाऱ्या जुन्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा सिडकोचा मानस आहे. याकरिता मागच्या ५० वर्षांतील सिडकोचे परिवहन, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा किंवा अन्य प्रकल्प, नवी मुंबईतील बस अथवा रेल्वे स्थानके, नवी मुंबई विकसित होण्यापूर्वीच्या काळातील या परिसरातील गावे, यांच्याशी संबंधित जुनी छायाचित्रे सिडकोच्या सीबीडी येथील जनसंपर्क कार्यालयात २५ नोव्हेंबरपर्यंत जमा करण्याचे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.