सिडको क्षेत्रात १0 टक्के पाणीकपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:42 AM2018-04-10T02:42:55+5:302018-04-10T02:42:55+5:30
प्रखर उन्हामुळे धरणातील जलसाठा कमी होत चालला आहे. पावसाळ्याला आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे.
नवी मुंबई : प्रखर उन्हामुळे धरणातील जलसाठा कमी होत चालला आहे. पावसाळ्याला आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे. अशात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पुढील वर्षासाठी पाणीसाठा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने सिडकोने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिडको क्षेत्रात पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेचे मोरबे, एमआयडीसीचे बारवी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाताळगंगा आणि सिडकोच्या हेटवणे धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा समाधानकारक पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. परंतु पावसाने दगा दिलाच तर पुढील वर्षासाठी पाण्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असते. त्यानुसार सिडकोने नवीन पनवेल, काळुंद्रे, कळंबोली, नावडे, कामोठे, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि उलवे या क्षेत्रात १९ मार्चपासून १0 टक्के पाणीकपात लागू केली आहे. उन्हाळ्यात पाण्याचा अधिक वापर होतो. असे असले तरी भविष्याची गरज ओळखून पाण्याचा जपून वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांतील नळाला लागलेली गळती, फुटक्या जलवाहिन्या, इमारतीच्या साठवण टाक्यांतून पाण्याची होणारी गळती थांबवावी. शॉवरऐवजी बादलीत पाणी घेवून आंघोळ करावी, कपडे धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा, अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत.
>पाणीकपातीनंतर सध्याची स्थिती
सिडको नोड पाण्याची गरज सध्याचा पुरवठा
खारघर ७0 एमएलडी ६५ एमएलडी
कळंबोली ४३ एमएलडी ३८ एमएलडी
कामोठे ३८ एमएलडी ३५ एमएलडी
नवीन पनवेल ४२ एमएलडी ३८एमएलडी