मुंबई बाजार समितीमध्ये सफरचंद, बासमतीपेक्षाही कांदा महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 01:51 AM2019-12-04T01:51:31+5:302019-12-04T01:51:43+5:30
मुंबई, नवी मुंबईमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन सरासरी १२०० ते १५०० टन कांद्याची आवश्यकता आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४२ वर्षांत प्रथमच कांद्याचे दर ८५ ते १२० रुपये किलो झाले आहेत. किरकोळ बाजारातील दर १०० ते १३० रुपयांवर गेले आहेत. आवक जवळपास ५० टक्के कमी झाली असल्यामुळे दर वाढले आहेत. परिणामी मुंबई बाजार समितीत सफरचंद आणि बासमती तांदळापेक्षा जादा भाव मिळत आहे.
मुंबई, नवी मुंबईमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन सरासरी १२०० ते १५०० टन कांद्याची आवश्यकता आहे; परंतु राज्यभर कांद्याची टंचाई निर्माण झालेली असल्यामुळे आवश्यकते एवढा माल विक्रीसाठी येत नाही. मंगळवारी बाजारात फक्त ७५६ टन आवक झाली आहे. आवक कमी असल्यामुळे बाजारभाव गगनाला भिडले आहेत. जुन्या कांद्याला १२० रुपये दर मिळाला असून, नवीन कांद्यालाही ८५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. किरकोळ बाजारातही कांदा १०० ते १३० रुपये दराने विकला जात आहे. पुणे व नाशिक जिल्ह्यामधून कांद्याची आवक होत आहे. हुबळीवरूनही काही प्रमाणात आवक सुरू आहे. जुना कांद्याचा साठा जवळपास संपत आला असून, पुढील १५ दिवसांमध्ये तो पूर्णपणे संपण्याची शक्यता आहे. पुढील जवळपास दोन महिने बाजारभावामध्ये तेजी कायम असणार आहे.
पहिल्यांदाच बाजार समितीमध्ये सर्व प्रकारची धान्य, फळे व भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक किंमत कांद्याला मिळू लागली आहे. सद्यस्थितीमध्ये सफरचंदला ६० ते ९० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. बासमती तांदूळ ८५ ते १००, शेवगा शेंग ५० ते ७० रुपये, उडीद डाळ ६७ ते ८७, मुगडाळ ८२ ते ९८, तुरडाळ ७२ ते ९०, वाटाणा ७० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात असून, कांदा ८५ ते १२० रुपये दराने विकला जात आहे.
नाशिकमध्ये लाल कांद्यालाही विक्रमी भाव
नाशिक : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक बंद झाली असून मंगळवारी २६७४ क्विंटल लाल कांदा क्विंटलमागे किमान २५०० ते कमाल ८९०१ रूपये आणि सरासरी ७१०० रूपये दराने विक्री झाला. लाल कांद्यालाही विक्रमी भाव मिळत असून सोमवारी बाजारभावाने आठ हजारांचा टप्पा पार करत उच्चांक केला.
देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्कस्थान येथून १७ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा डिसेंबरच्या शेवटी तसेच जानेवारीच्या सुरु वातीस दाखल होणार आहे. त्यामुळे बाजारभाव आटोक्यात येतील, असे बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले. तर मंगळवारी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याने १४ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. सरासरी भाव १३,५०० रुपये होते.
सोलापूरमध्ये सर्वाधिक १५ हजारांचा दर
सोलापूर : सोलापूर बाजार समितीत सोमवारी कांद्याला सर्वाधिक १५ हजारांचा भाव मिळाला. मंगळवारी ३० हजार ६१४ क्विंटल कांदा विक्रीतून १२ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपये उलाढाल झाली.
मंगळवारी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील सुभाष पोपट निंबाळकर व नितीन कुदळे यांच्या कांद्याला क्विंटलला सर्वाधिक १५ हजार रुपयाचा दर मिळाला. क्विंटलला उच्चांकी १५ हजार रुपये तर सरासरी ४२०० रुपये इतका भाव मिळाला.
टोमॅटो दीड रु पये किलो
नाशिक : परतीच्या पावसाचा फटका टोमॅटोलाही बसला असून २० किलोच्या क्रेटला ३० ते ८० रुपये भाव मिळत आहे. निर्यातक्षम टोमॉटो चार ते सहा रूपये किलो दरापर्यंत घसरला आहे. लाल व गारशेल (कवडी फुटलेला ) टोमॅटो प्रतिकिलो दीड ते दोन रु पये विकला जात आहे.
पुढील आठवड्यात इजिप्तचा कांदा येणार
मुंबईमध्ये कांदाटंचाई सुरू असल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी कांदा आयात करण्यास सुरुवात केली आहे. इजिप्तवरूनही कांदा मागविण्यात आला आहे. पुढील आठवड्यामध्ये इजिप्तचा कांदा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होऊ लागली असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. नवीन कांद्यास ८५ रुपयेपर्यंत व जुन्या मालास १२० रुपयापर्यंत भाव मंगळवारी मिळाला आहे. पुढील काही महिने बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता असून, उन्हाळी कांदा दाखल झाल्यानंतरच दर पूर्णपणे नियंत्रणात येतील. - राजेंद्र शेळके, अध्यक्ष, कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ