लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : निर्धारित वेळेत पैसे भरले नाहीत म्हणून घरांचे वाटप रद्द केलेल्या सिडकोच्या दोन हजार ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मध्यस्थी करीत, सिडकोला तसे निर्देश दिल्याने आता ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने २०१८ मध्ये १५ हजार घरांची घोषणा केली. त्यासाठी राज्यभरातून दोन ते अडीच लाख अर्ज सिडकोला प्राप्त झाले होते. यातील पात्र अर्जदारांची सोडत काढण्यात आली. यात यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना घराचे पैसे भरण्यासाठी सहा समान हप्ते विभागून देण्यात आले; परंतु यापैकी अनेक अर्जदारांनी निर्धारित वेळेत पैसे भरले नाहीत. अशा जवळपास दोन हजार अर्जदारांच्या घरांचे वाटपपत्र रद्द केल्याचे सिडकोच्या पणन विभागाने जाहीर केले होते, त्यामुळे पैसे भरण्यासाठी मुदत मिळावी, यासाठी या अर्जदारांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती.त्याची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सदर प्रकरणात अर्जदारांना मुदत वाढवून देण्याचे निर्देश सिडकोला दिले आहेत. त्यानुसार आता ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली असून, ज्यांनी आतापर्यंत एकही हप्ता भरला नाही, त्या सर्वांनाच पुन्हाएक संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्जदारांना अखेर सिडकोचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:43 PM